भूमीच्या मालकाने मदरसा न उभारण्याची दिली हमी
वास्को, ६ डिसेंबर (वार्ता.) – शहरात नौसेनेच्या ‘एन्.डी.एस्.’डेपोच्या विरुद्ध बाजूच्या अनधिकृत भूमीत मदरसा किंवा मशीद उभारली जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात होती. श्री परशुराम गोमंतक सेनेचे श्री. शैलेंद्र वेलींगकर, राष्ट्रीय हिंदु युवा वाहिनीचे श्री. तिवारी आदी मिळून अनेक संघटनांचे प्रतिनिधी यांनी संबंधित भूमीच्या मालकांकडे चर्चा केली. भूमीच्या मालकाने संबंधित ठिकाणी कोणत्याही स्वरूपाचे धार्मिक स्थळ उभारले जाणार नसल्याची हमी हिंदुत्वनिष्ठ संघटनांना दिली.
सविस्तर वृत्त असे की, वास्को शहरात अनधिकृत भूमीत मशीद किंवा मदरसा उभारला जाणार असल्याची माहिती असलेला एक ‘व्हिडिओ’ काही दिवसांपूर्वी सामाजिक माध्यमांत फिरत होता. याविषयी माहिती मिळाल्यानंतर श्री परशुराम गोमंतक सेनेचे श्री. शैलेंद्र वेलींगकर, राष्ट्रीय हिंदु युवा वाहिनीचे श्री. तिवारी आदी मिळून अनेक संघटनांच्या सुमारे ७५ जणांनी संबंधित भूमीचे मालक शरीफ शेख यांना चर्चेसाठी निमंत्रित केले. या वेळी चर्चेत शरीफ शेख यांनी संबंधित ठिकाणी मदरसा किंवा मशीद उभारली जाणार नसल्याची ग्वाही हिंदुत्वनिष्ठ संघटनांना दिली. शरीफ शेख यांनी हिंदूंच्या धार्मिक भावनांचा आदर राखून लेखी स्वरूपात हे आश्वासन दिल्याचे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी सांगितले.