उत्तरप्रदेशमध्ये पत्रकार आणि त्याचा मित्र यांची घरात सॅनिटायझरद्वारे जाळून हत्या

पत्रकाराने घोटाळा उघड केल्याचा परिणाम !

उत्तरप्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत गंभीर आहे, हे प्रतिदिन वेगवेगळ्या घटनांमधून उघड होत आहे. ही स्थिती पालटण्यासाठी केंद्र सरकारनेही राज्य सरकारला साहाय्य करावे, असेच जनतेला वाटते !

बलरामपूर (उत्तरप्रदेश) – येथे ३५ वर्षीय पत्रकार राकेश सिंह आणि त्यांचा मित्र पिंटू राहू यांची घरावर सॅनिटायझर ओतून आग लावून हत्या केल्याची घटना घडली. ही आग लावल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ललित मिश्रा, केशवानंद मिश्रा उपाख्य रिंकू आणि अक्रम अली या तिघांना अटक केली आहे. तिघांनीही चौकशीत हत्या केल्याचा गुन्हा स्वीकारला आहे.

 (सौजन्य : NDTV)

बलरामपूरचे पोलीस अधीक्षक देवरंजन वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार केशवानंद याची आई गावाची प्रमुख होती. तिने केलेला घोटाळा राकेश सिंंह यांनी उघड केला होता. याचा राग आरोपीच्या मनात होता. चर्चा करण्याच्या निमित्ताने आरोपी हे राकेश सिंह यांच्या घरी गेले होते. या वेळी त्यांनी राकेश सिंह आणि त्यांच्या मित्राला मद्य पाजले अन् त्यांचे घर सॅनिटायझर ओतून जाळले. घर जाळण्यासाठी ललित मिश्रा आणि केशवानंद मिश्रा यांनी अक्रम अली उपाख्य अब्दुल कादिर याचे साहाय्य घेतले. अशा प्रकारचे गुन्हे कादिर याने याआधीही केले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. स्थानिक प्रशासनाने मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचे साहाय्य केले.