महाराष्ट्र सरकारच्या कारभारावर मनसे आणि भाजप यांची टीका

महाराष्ट्र सरकारची वर्षपूर्वी 

कुडाळ – महाराष्ट्र राज्यात सत्तेवर असलेल्या महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. या वर्षपूर्तीनिमित्त माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार नारायण राणे आणि मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर टीका करतांना या सरकारने जनतेचा अपेक्षाभंग केल्याची टीका केली आहे.

महाविकास आघाडीची वर्षपूर्ती म्हणजे केवळ दिखावा ! – नारायण राणे, खासदार, भाजप

नारायण राणे

महाविकास आघाडीची वर्षपूर्ती म्हणजे केवळ दिखावा आहे. या सरकारला राज्याचा विकास करायला जमलेले नाही. राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. रोजगार, नोकर्‍या यांचा प्रश्‍न आहे. विकासाच्या संदर्भात शून्य प्रगती असून कोरोनामुळे मृत्यू होण्याच्या प्रमाणात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे, ही महाविकास आघाडीच्या सरकारची पहिल्या वर्षातील प्रगती आहे, अशी उपहासात्मक टीका माजी मुख्यमंत्री तथा भाजपचे खासदार नारायण राणे यांनी येथे केली. कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत महाविकास आघाडीच्या वर्षपूर्तीवर खासदार राणे बोलत होते.

महाविकास आघाडी सरकारकडून जनतेचा अपेक्षाभंग ! – परशुराम उपरकर, मनसे

परशुराम उपरकर

महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण झाले. या कालावधीत सरकारने जनतेला काय दिले ? जिल्ह्यातील आकारीपड, वनसंज्ञा, हत्तींचा उपद्रव, शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्‍न आहेत तसेच राहिले. कोकणातील जनतेने ज्या अपेक्षेने शिवसेनेला निवडून दिले, तिचा अपेक्षाभंग महाविकास आघाडी सरकारने केला आहे, अशी टीका मनसेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.