नाशिक महानगरपालिकेच्या विरुद्ध महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार

नाशिक – येथील वाघाडी नदीच्या प्रदूषणाच्या सूत्रावर नाशिक महानगरपालिकेच्या विरुद्ध महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे.

वाघाडी (नदी) नाल्याच्या माध्यमातून चॅनल गेट सोडून लाखो लिटर सांडपाणी प्रक्रिया न करताच थेट नदीपात्रात सोडण्यात आले. (पालिका प्रशासनाच्या लक्षात का आले नाही ? गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी कांगावा करणारे तथाकथित पर्यावरणवादी आणि अंनिसवाले  आता कुठे आहेत ? – संपादक) या संदर्भात गोदावरी प्रदूषणाविरोधात जनहित याचिका प्रविष्ट करणारे निशिकांत पगारे यांनी महापालिकेच्या संबंधित अधिकार्‍यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीवर नावापुरती कारवाई करण्यात आली. तसेच महापालिकेच्या अधिकार्‍यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचे केवळ सोपस्कार करण्यात आले, असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे होते.

या प्रकाराविषयी महापालिका प्रशासनाला कुठलेही गांभीर्य नसून गोदाप्रदूषण मुक्तीकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे गोदावरी प्रदूषित करणार्‍या विरोधात ठोस कारवाई न करणार्‍या महापालिका प्रशासनाची भूमिका संशयास्पद आणि दिशाभूल करणारी असा आरोप पगारे यांनी केला आहे.