प्रदूषित हवा : वाढती समस्या !

‘कोलोरॅडो स्टेट युनिव्हर्सिटी’ आणि ‘आयआयटी, मुंबई’ येथील संशोधक देशभरातील प्रदूषणाचे विश्‍लेषण करत आहेत. ग्रामीण भागांमध्ये असणार्‍या प्रदूषणाच्या समस्येकडे या संशोधकांनी लक्ष वेधले आहे. प्रदूषणाची समस्या शहरी भागांमध्येच अधिक आहे, असा समज होता; पण ग्रामीण भागही मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत असल्याचे दिसून येत आहे. प्रदूषणाविषयीच्या विश्‍लेषणामध्ये असे दिसून आले की, ग्रामीण भागांमध्ये ‘पी.एम्. २.५’ (सूक्ष्म धूलिकण (पार्टिक्युलेट मॅटर)) या प्रदूषकामुळे, तसेच ओझोनमुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण शहरी भागांपेक्षा तिप्पट आहे. वर्ष २०१८ मध्ये ‘लॅसेंट’ या वैद्यकीय नियतकालिकात ‘इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’चा (‘आय.सी.एम्.आर्.’चा) एक अभ्यास प्रसिद्ध करण्यात आला. या अभ्यासात नमूद करण्यात आले होते की, देशातील जवळपास ७६.८ टक्के लोकसंख्या ‘पी.एम्. २.५’ कणांच्या हवेत श्‍वास घेते. पुणे शहरामध्येही दिवाळीच्या काळात या प्रदूषकाचे प्रमाण २०० एककने वाढल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या.

प्रातिनिधिक छायाचित्र

शहरीकरण न झालेल्या भागांमध्ये देशातील ७० टक्के जनता रहाते. ही लोकसंख्याही शहरी भागाइतक्याच प्रदूषणाची बळी ठरत आहे. भारतामध्ये सुमारे १०.५ लाख लोकांचे मृत्यू हृदय किंवा फुप्फुस यांच्या आजारामुळे आणि तेही अल्पवयात होतात. ‘पी.एम्. २.५’ या प्रदूषकाचा सामना करावा लागल्याने हे मृत्यू होतात. यातील ६९ टक्के मृत्यू शहरीकरण न झालेल्या भागांतील आहेत, असेही यामध्ये उघड झाले आहे. हे प्रदूषक मनुष्याच्या फुप्फुस आणि रक्त यांमध्ये मिसळते. प्रदूषणाचे स्रोत भिन्न असले, तरी ‘पी.एम्. २.५’ या प्रदूषकामुळे शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांमध्ये सारखेच संकट आहे.

यावरून असे लक्षात येते की, ग्रामीण भागांतही आता प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे शहरातीलच नव्हे, तर ग्रामीण भागांतील जनतेनेही आता याकडे गांभीर्याने पहाण्याची आवश्यकता आहे. देशी वृक्षांची अधिकाधिक लागवड करून वातावरणातील प्रदूषण नियंत्रित करून स्वतःचे पर्यायाने पृथ्वीचे रक्षण करणे आवश्यक आहे.

– श्री. नीलेश पाटील, जळगाव