सध्या पुणे, मुंबई येथे पुढील ४ दिवस ‘उष्णतेची लाट’ येण्यासंबंधी सूचना आहे. दुपारचे तापमान ३७ सेल्सियसपर्यंत जात आहे. त्यामुळे डोके आणि डोळे यांची अधिकच काळजी घ्या. उन्हाळ्याचे तापमान वाढत असले, तरी शाळांना सुट्टी लागण्यास वेळ आहे. सर्दी, खोकला यांमधून रुग्ण बाहेर पडत आहेत, तोपर्यंत वाढलेल्या तापमानामुळे डोळ्यांची जळजळ, लालपणा, डोकेदुखी अशा लक्षणांचे आजार चालू झाले आहेत. विशेषतः दुपारी १२ ते २ मध्ये मुलांची गाडीवर ने-आण करणार्या आई-बाबांनी स्वतःचे आणि मुलांचे डोके अन् डोळे यांची काळजी नक्की घ्यावी.

आयुर्वेदामध्ये डोळे आणि डोके यांचे उष्णतेपासून संरक्षण करायला सांगितले आहे. ‘अंघोळ करतांना डोक्यावरून कोमट पाण्याने करावी अन्यथा केस आणि डोळे यांना त्रास होतो’, असा सल्ला आहे. डोळ्याच्या ठिकाणी स्वेदन, म्हणजेच वाफ / उष्णता देतांनाही तारतम्याने वातावरणाचा अंदाज घेऊन अत्यल्प किंवा शक्यतो देऊच नये, असे सांगितले आहे.
फिकट रंगाचे, सुती कापडाचे स्कार्फ आणि चांगल्या कंपनीचा गॉगल स्वतःला अन् मुलांना वापरला, तर लाभ होईल. डोळ्याला उष्णतेने होणारी जळजळ, लालपणा यांसाठी आयुर्वेदात आलेल्या औषधी वनस्पती, औषधी तूप, तसेच बिडालक (लेप), अन्नलेप, पादाभ्यंग, तर्पण या उपक्रमांचा लाभ होतो. यासाठी वैद्यांचा सल्ला जरूर घ्यावा.
– वैद्या (सौ.) स्वराली शेंड्ये, यशप्रभा आयुर्वेद, पुणे. (१९.३.२०२५)