पाकमधील मिराज विमाने, पाणबुडी यांच्यात सुधारणा करण्याला फ्रान्सकडून नकार

पॅरिस (फ्रान्स) – पाकिस्तानकडे फ्रेंच बनावटीची मिराज लढाऊ विमाने, एअर डिफेन्स सिस्टिम आणि ‘अ‍ॅगोस्टा ९० बी’ वर्गातील पाणबुडी आहे. पाकने या शस्त्रांमध्ये सुधारणा करण्याची विनंती केली होती; मात्र फ्रान्सने ही मागणी धुडकावून लावली आहे.

काही आठवड्यांपूर्वी पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यावर टीका केली होती. मॅक्रॉन यांनी इस्लाम आणि कट्टरपंथीय विचारसरणी यांविषयी केलेल्या विधानावर इम्रान खान यांनी टीका केली होती. त्याचीच ही परिणती आहे. सप्टेंबर मासामध्ये शार्ली हेब्दो नियतकालिकाच्या जुन्या कार्यालयाजवळ आक्रमण झाले होते. त्यात अली हसन नावाच्या पाकिस्तानी वंशाच्या युवकाने २ जणांना चाकूने भोसकले होते. या अली हसनचे वडील पाकिस्तानात रहातात. ते नंतर स्थानिक वृत्तवाहिनीला म्हणाले होते की, माझ्या मुलाने पुष्कळ चांगले काम केले आहे. या आक्रमणाविषयी मी आनंदी आहे.