स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेतल्यावर शक्ती मिळून शरिरावरील त्रासदायक आवरण दूर झाल्याचे जाणवणे आणि उत्साह वाढणे

१. उत्साह न्यून होऊन व्यष्टी साधना आणि समष्टी साधना यांची सांगड घालता न येणे, सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे संतांच्या समवेत बसून नामजप केल्यावर थोडे बरे वाटणे

‘दोन दिवसांपासून ‘माझी व्यष्टी साधनेची घडी विस्कटली आहे’, असे वाटून माझ्या मनाची स्थिती चांगली नव्हती. माझा उत्साह न्यून झाला होता. नियोजनाच्या अभावामुळे मला व्यष्टी साधना आणि समष्टी साधना यांची सांगड घालणे कठीण झाले होते. माझा स्वतःकडून अपेक्षा करण्याचा भाग वाढला होता. मला ‘नेमके काय करावे ?’, हे कळत नव्हते. ‘कुणाचे तरी साहाय्य घ्यावे’, असा मनात विचार येऊनही माझी कुणाचे साहाय्य घेण्याची स्थिती नव्हती. मला मनमोकळेपणाने बोलता येत नव्हते. मी सद्गुरु डॉ. गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारले. त्यांनी सांगितलेला नामजप करूनही माझ्यावरील आवरण दूर होत नव्हते; म्हणून मी पुन्हा सद्गुरु डॉ. गाडगीळकाकांना विचारलेे. त्यांनी संत करत असलेल्या नामजपाच्या वेळी त्यांच्या समवेत बसून नामजप करायला सांगितला. तेव्हा मला थोडे बरे वाटले. घरी गेल्यावर दुसर्‍या दिवशी सकाळी मला पुन्हा तसेच वाटत होते. ‘ही स्थिती नको’, असे मला वाटत होते.

श्री. सुमित सागवेकर

२. स्वरक्षण प्रशिक्षण घेणार्‍या महिलांसाठी वर्ग घेतल्यावर झालेली मनाची स्थिती

२ अ. मन सकारात्मक होऊन स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेता येणे : मला दुपारी स्वरक्षण प्रशिक्षण घेणार्‍या महिलांसाठी वर्ग घ्यायचा होता. माझ्या पोटात सकाळपासून दुखत होते. ‘मला वर्ग घेता येईल का ?’, असा प्रश्‍न होता. तेव्हा देवाने या विचारावर मात करवूून घेतली आणि मन आपोआप सकारात्मक होऊन मला वर्ग घेता आला.

२ आ. स्वरक्षण प्रशिक्षणवर्ग घेतल्यावर हलकेपणा जाणवून उत्साह वाटणे : महिला प्रशिक्षिकांचा वर्ग घेतांना मला त्रास होत होता, तरी ‘शरिरात कुठून तरी शक्ती निर्माण होत आहे’, याची मला जाणीव नव्हती. वर्ग झाल्यावर एका साधकाशी व्यष्टी साधनेच्या आढाव्यासंदर्भात बोलत असतांना माझ्या लक्षात आले, ‘मी २ दिवसांपासून मनाच्या नकारात्मक स्थितीतून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होतो, तरी मला बाहेर पडता येत नव्हते; पण आज वर्ग घेतल्यावर ‘शरिराला चिकटलेले सर्व निघून गेले आहे’, असे मला जाणवले. वर्ग घेतल्यानंतर मला हलकेपणा जाणवला. माझ्या आनंदात वाढ होऊन उत्साह वाटत आहे.’

२ इ. ‘देवाची शक्ती स्वरक्षण प्रशिक्षणातील प्रत्येक प्रकारात कार्यरत आहे’, याची अनुभूती येणे : मला होत असलेले त्रास महिला प्रशिक्षिकांचा एक वर्ग घेतल्यावर दूर झाले. मला ज्यातून बाहेर पडता येत नव्हते, त्यातून देव आणि संत यांच्या कृपेने मला बाहेर पडता आले. ‘देवाची शक्ती या स्वरक्षण प्रशिक्षणातील प्रत्येक प्रकारात कार्यरत आहे’, याची अनुभूती घेतल्यावर माझी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त झाली.’

– श्री. सुमित सागवेकर, युवा संघटक, हिंदु जनजागृती समिती (१४.१०.२०२०)

• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक