कार्तिक मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

साप्ताहिक शास्त्रार्थ

१. हिंदु धर्मानुसार ‘शार्वरी’ नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४२, दक्षिणायन, शरदऋतू, कार्तिक मास आणि शुक्ल पक्ष चालू आहे.


(संदर्भ : दाते पंचांग)

सौ. प्राजक्ता जोशी

२. शास्त्रार्थ

२ अ. गोपाष्टमी : कार्तिक शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला ‘गोपाष्टमी’ साजरी करतात. या दिवशी भगवान श्रीकृष्णासह गायीचे पूजन करून तिला प्रदक्षिणा घालतात. भगवान श्रीकृष्णाने याच तिथीला गायींना चरायला नेण्यास आरंभ केला. गोमातेच्या सेवेने सर्व देवता प्रसन्न होतात. या दिवशी गायीच्या मागून चालतात.

२ आ. कूष्मांड नवमी : कार्तिक शुक्ल पक्षातील नवमी तिथीला ‘कूष्मांड नवमी’, ‘अक्षय नवमी’, ‘धात्री (आवळा) नवमी’ किंवा ‘आरोग्य नवमी’ असेही म्हणतात. कार्तिक शुक्ल पक्षातील नवमी तिथीला ‘धात्री (आवळा) नवमी’ किंवा ‘आरोग्य नवमी’ म्हणतात; कारण आयुर्वेदात आरोग्यासाठी लाभदायक असणार्‍या आवळा या फळाला आरोग्यवर्धक मानले आहे. आवळा खाल्ल्याने शरीर शुद्ध (डिटॉक्स) होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास साहाय्य होते. या दिवशी भगवान विष्णु आणि श्री कूष्मांडादेवी यांची आवळीच्या झाडाखाली पूजा केल्याने सर्व रोग, शोक आणि भय यांपासून मुक्ती मिळते. कूष्मांड म्हणजे कोहळा. या दिवशी आवळीच्या झाडाच्या मुळाजवळ श्रीविष्णूचे पूजन करतात. आवळीच्या झाडाला प्रदक्षिणा घालतात. नंतर

​कूष्माण्डं बहुबीजाढ्यं ब्रह्मणा निर्मितं पुरा ।
​दास्यामि विष्णवे तुभ्यं पितृणां तारणाय च ॥  व्रतशिरोमणि

अर्थ : हे विष्णु, प्राचीन काळी ब्रह्मदेवाने निर्माण केलेला, अनेक बिजांनी (बियांनी) युक्त असा हा कोहळा मी पितरांच्या उद्धारासाठी तुला दान करत आहे.

​अशी प्रार्थना करून कोहळा गायीच्या तुपात बुडवून ब्राह्मणाला दान करतात.

२ इ. प्रबोधिनी (स्मार्त) एकादशी : कार्तिक शुक्ल पक्षातील एकादशीला ‘प्रबोधिनी (स्मार्त) एकादशी’ म्हणतात. या दिवशी ‘विष्णु प्रबोधोत्सव’ साजरा करतात; कारण आषाढ शुक्ल एकादशीपासून योगनिद्रेत असलेला भगवान श्रीविष्णु कार्तिक शुक्ल एकादशीला योगनिद्रेतून जागा होतो. या दिवशी भगवान विष्णूच्या दामोदर रूपाची पूजा करतात. सूर्योदयाला जी एकादशी तिथी असते, तिला ‘स्मार्त एकादशी’ म्हणतात. स्मृतींना पाळणारे स्मार्त एकादशी पाळतात.

२ ई. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते. त्या काळालाच ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. २५.११.२०२० या दिवशी दुपारी ३.५५ पासून २६.११.२०२० या दिवशी पहाटे ५.११ पर्यंत विष्टी करण आहे.

२ उ. भागवत एकादशी : कधी कधी एका पक्षात स्मार्त आणि भागवत अशा सलग दोन एकादशी तिथी येतात. भागवत धर्म पाळणारे वारकरी भागवत एकादशी पाळतात. स्मार्त आणि भागवत या दोन एकादशी दोन स्वतंत्र दिवशी येतात. प्रत्येक मासाच्या प्रत्येक पक्षात अशा दोन एकादशी येतीलच, असे नाही.

२ ऊ. चातुर्मास्य समाप्ती : चार्तुमासात केलेल्या व्रताची समाप्ती या दिवशी करतात. या दिवसापासून तुलसी विवाह साजरा करून मंगल कार्ये चालू होतात.

२ ए. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. २६.११.२०२० या दिवशी पहाटे ५.११ पासून रात्री ९.२० पर्यंत आणि २७.११.२०२० या दिवशी उत्तररात्री १२.२३ पासून २८.११.२०२० सकाळी १०.२२ पर्यंत घबाड मुहूर्त आहे.

२ ऐ. वैकुंठ चतुर्दशीचा उपवास : कार्तिक शुक्ल पक्षातील चतुर्दशीला वैकुंठ चतुर्दशीचा उपवास करतात. या दिवशी आवळीचे झाडाखाली मध्यरात्री विष्णुपूजन करून नंतर अरुणोदयी शिवपूजन करतात.

टीप १ :दुर्गाष्टमी, घबाड मुहूर्त, भद्रा (विष्टी करण), एकादशी आणि प्रदोष यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे.

टीप २ :या लेखात दिलेल्या सारणीतील शुभ किंवा अशुभ दिवस पाहून ‘दिवस अशुभ आहे’, हे कळल्यावर ‘प्रवास किंवा इतर सेवा केल्यास त्याचे अशुभ परिणाम भोगावे लागतील’, अशी शंका साधकांच्या मनात निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा साधकांनी संतांची पुढील वचने लक्षात ठेवावीत.

हरिचिया दासा हरि दाही दिशा ।
भावें जैसा तैसा हरि एक ॥ – संत एकनाथ

अर्थ : भक्ताला सर्वत्र देवाचेच दर्शन होते. भक्ताचा जसा भाव असतो, त्या स्वरूपात त्याला देव दिसतो.

तुका म्हणे हरिच्या दासा ।
शुभ काळ दाही दिशा ॥ – संत तुकाराम

अर्थ : तुकाराम महाराज म्हणतात, ‘भक्तासाठी सर्व दिशा आणि वेळ ही शुभच असते.’

​ज्या व्यक्तीच्या मनात सतत ईश्‍वरप्राप्तीचा ध्यास आहे, अशा भक्ताची काळजी ईश्‍वर घेतो.’

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्‍लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, फोंडा, गोवा. (१५.११.२०२०)