वाढीव वीजदेयकांच्या विरोधात भाजपाचे कणकवली येथे आंदोलन

कणकवली, २० नोव्हेंबर (वार्ता.) –  वाढीव वीजदेयकांच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी येथील महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करून महावितरण आणि राज्यसरकार यांचा निषेध केला. या वेळी भाजप कार्यकर्त्यांना प्रवेशद्वारावर अडवून कार्यकारी अभियंत्यांना भेटण्यासाठी केवळ ५ जणांचे शिष्टमंडळ जाईल, अशी भूमिका पोलिसांनी घेतल्याने, पोलीस आणि भाजप कार्यकर्ते यांच्यामध्ये बाचाबाची झाली. अखेर महावितरणचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब मोहिते यांनी प्रवेशद्वारावर येऊन भाजप कार्यकर्त्यांचे निवेदन स्वीकारले आणि १० डिसेंबर या दिवशी या समस्येवर बैठक घेण्यात येईल, असे आश्‍वासन दिले.

महाराष्ट्र सरकारने वीजदेयक माफ करणार असल्याची घोषणा केली होती; मात्र वीजमंत्र्यांनी वीजदेयके माफ होणार नाहीत, असे घोषित केल्यानंतर भाजपाने जिल्हाभरात मोर्चे, निदर्शने चालू केली आहेत. त्याच पार्श्‍वभूमीवर कणकवली येथे वीज वितरण कार्यकारी अभियंता कार्यालयावर तालुका भाजपच्या वतीने २० नोव्हेंबरला आंदोलन छेडण्यात आले. या वेळी ‘ठाकरे सरकारचा निषेध असो’, ‘वीज दरवाढ रहित झालीच पाहिजे’, ‘महावितरण हाय हाय’, ‘पोलिसांच्या आडून दादागिरी करणार्‍या सरकारचा निषेध असो’, अशा घोषणा भाजपा कार्यकर्त्यांनी दिल्या. पोलिसांनी प्रवेशद्वारावर अडवताच शहराध्यक्ष अण्णा कोदे यांनी रस्त्यात ठिय्या मारत सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.