शाहूपुरी पोलीस ठाण्यात अनेक दुचाकी धुळखात पडून !

आंधळे पोलीस !

प्रतीकात्मक छायाचित्र

सातारा, १९ नोव्हेंबर (वार्ता.) – शाहूपुरी पोलीस ठाण्यात अनेक दुचाकी वाहने धुळखात पडून आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यात विविध कामांसाठी येणार्‍या नागरिकांना वाहने कुठे लावायची, असा प्रश्‍न पडत आहे. शाहूपुरी पोलिसांनी विविध गुन्ह्यांतील आणि अपघातांतील ४० हून अधिक दुचाकी वाहने पकडून आणली आहेत. या वाहनांविषयी न्यायालयात विविध खटले चालू आहेत. त्यामुळे ही वाहने पोलीस ठाण्यात धुळखात पडून आहेत.

पोलीस ठाण्याची स्थापना झाल्यानंतर २ वर्षांनी वाहनांचा लिलाव झाला होता; मात्र आता अनेक वर्षांपासून लिलाव झालेला नाही. त्यामुळे वाहनांची दुरावस्था झाली असून आरसे, सीट्स, फूटरेस्ट, डिक्की गायब झाले आहेत. काही खटल्यांमध्ये न्यायालय निर्णय देऊन वाहने वाहन मालकांच्या कह्यात देते; मात्र त्याचे प्रमाण अल्प आहे. याविषयींचे खटले जलद गतीने निकाली काढून पोलीस ठाण्याची जागा मोकळी करावी, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.