५६ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला वडोदरा (गुजरात) येथील कु. सोहम् रवींद्र पोत्रेकर (वय ९ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. सोहम् रवींद्र पोत्रेकर हा एक आहे !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कु. सोहम् रवींद्र पोत्रेकर

(‘वर्ष २०१५ मध्ये कु. सोहम्’ची आध्यात्मिक पातळी ५१ टक्के होती.’ – संकलक)

१. कुशाग्र बुद्धी

अ. ‘सोहम्’ची बुद्धीमत्ता पुष्कळ चांगली आहे. ‘याला बुद्धी पुष्कळ आहे. त्यामुळे तो सतत शिकतो आणि पटकन ग्रहण करतो’, असे सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकरताई आणि पू. (सौ.) संगीता जाधवकाकू यांनी सांगितले.

आ. शाळेत सर्वच शिक्षक त्याच्या बुद्धीमत्तेचे नेहमी कौतुक करतात.  त्याच्या शाळेतील शिक्षेकेने ‘त्याचे वर्तन पुष्कळ चांगले आहे. तुमच्या पोटी असा मुलगा जन्माला आला. तुम्ही नशीबवान आहात’, असे सांगितले.

२. चित्रकलेची आवड

तो ५ वर्षांचा असतांना त्याने काढलेल्या चित्रांतील एक चित्र त्याच्या चुलत भावाने महाविद्यालयातील शिक्षकांना दाखवले. ‘तेव्हा इतका लहान मुलगा एवढे सुंदर चित्र काढतो’, याचे त्यांना फार कौतुक वाटले होते. तो ७ वर्षांचा असतांना त्याने ‘पोस्ट पेपर’वर (आकाराने मोठ्या कागदावर) निसर्गाचे सुंदर चित्र काढले होते. त्याचा चुलत भाऊ ‘फाईन आर्ट’चे शिक्षण घेतो. त्याने चित्र पाहिल्यावर तो मला म्हणाला, ‘‘सोहम्’ने सुंदर चित्र काढले आहे. एवढे बारकावे आमच्या वर्गातील मोठ्या मुलांच्याही लक्षात येत नाहीत.’’ तो पूर्वी निसर्ग, कृष्ण आणि आगगाडी यांची चित्रे काढायचा. तो अधूनमधून विठ्ठलाचे चित्र काढायचा. आता त्याला विष्णूच्या अवतारांची चित्रे काढायला आवडतात.

३. कल्पकता

त्याला सतत विविध वस्तू बनवायला आवडतात. त्याने ६ मासांपूर्वी ‘सूर्यमाले’ची टोपी केली होती. त्याने सर्व चित्र हाताने काढली आणि नंतर सर्व आकार कात्रीने कापून त्याची टोपी बनवली.

४. धाकट्या भावाची काळजी घेणे

सोहम् अद्वैतला (धाकट्या भावाला) पुष्कळ साहाय्य करतो. तो अद्वैतचा अभ्यास घेतो, तसेच त्याला समजावून सांगतो. अद्वैतला अंधाराची भीती वाटते. बालसंस्कारवर्गात सांगितल्याप्रमाणे सोहम्’ने रात्री अद्वैतला घेऊन त्याचा सराव करून घेतला आणि अद्वैतची भीती न्यून करून त्याच्यात आत्मविश्‍वास निर्माण केला. आता अद्वैतला भीती वाटली, तरी तो भीतीकडे लक्ष न देता ‘मी जाऊन करतो’, असे म्हणतो.

५. प्राण्यांवर प्रेम करणे

सोहम् ३ वर्षांचा असतांना माझ्याकडे साखर मागायचा आणि आगाशीत ठेवायचा. त्याला याविषयी विचारल्यावर तो म्हणायचा, ‘‘मुंग्यांना जेवण शोधायला त्रास नको. त्यांना इथे पटकन मिळेल.’’ घरात फार मुंग्या होत नाहीत. त्याला एखादी दिसली, तरी ‘तिला जेवण मिळायला पाहिजे’, असे त्याला वाटते.

६. झाडांची आवड

त्याला झाडांना पाणी घालायला फार आवडते. तो झाडांशी प्रेमाने बोलतो. घरी कुठलेही फळ आणल्यानंतर तो त्याचे बी घेऊन ते कुंडीत लावतो. कुंडीत फळ उगवत नसल्याचे त्याला सांगितल्यावर तो सांगतो, ‘‘कुंडीत थोडे उगवल्यानंतर आपण कुठेही शेत दिसल्यावर तेथे नेऊन लावूया.’’ (सोहम्’च्या वेळी मी गर्भवती असतांना आम्ही अमेरिकेत होतो. त्याच्या बाबांनाही झाडे आणि शेती यांची पुष्कळ आवड असल्यामुळे तिथे भाड्याने एक छोटीशी जागा (‘प्लॉट’) घेऊन त्यात ते विविध झाडे लावायचे. तेव्हा ते मला तिथे नेऊन गर्भातील बाळाला ‘भूमी कशी खोदायची ? माती भुसभुशीत कशी करायची, म्हणजे झाडे चांगली उगवतात ?’, हे सांगायचे. ‘त्याचाही हा परिणाम असू शकेल’, असे मला वाटते.)

७. नियोजनकौशल्य

त्याला ‘तुझे दिवसभराचे नियोजन करून दाखव’, असे सांगितल्यावर तो चांगले नियोजन करतो आणि जिथे जमत नसेल, तिथे साहाय्य घेऊन पूर्ण करतो. नंतर तो नियोजन लिहिलेला कागद एका जागी ठेवतो आणि येता जाता ‘आता कशाची वेळ झाली आहे ?’, हे पाहून त्यानुसार कृती करतो.

८. रामनाथी आश्रमात जाऊन साधना करण्याची तळमळ

त्याचा शाळेत (आता ‘ऑनलाईन’ शाळा असते.) विज्ञानाचा तास असतो. त्या वेळी त्याला काही गोष्टी शिकवतात, उदा. ‘पृथ्वी गोल आहे’, हा शोध अमुक शास्त्रज्ञाने लावला होता. तोपर्यंत सर्वांना ‘पृथ्वी सपाट आहे’, असे वाटत होते. हे ऐकल्यावर तो मला म्हणाला, ‘‘आई, शाळेत सगळे खोटे शिकवतात. यांना आपले वेद, शास्त्रे, ऋषी आणि संत ठाऊक नाहीत का ? मला असे शिक्षण घ्यायचे नाही. तू मला रामनाथी आश्रमात घेऊन चल. मला तिथेच शिकायचे आहे.’’ त्यासाठी तो परात्पर गुरु डॉक्टरांना प्रार्थना करतो, ‘माझ्या बाबांना रामनाथी आश्रमात कायमस्वरूपी येण्याची बुद्धी द्या. मला इथे नाही, रामनाथीलाच रहायचे आहे.’

९. आज्ञापालन केल्याने केवळ सव्वा घंट्यात सायकल चालवण्यास शिकणे

आम्ही त्याला सायकल शिकवत होतो. त्या वेळी त्याला समोर बघून सायकल चालवण्यास सांगितल्यावर तो अगदी समोरच बघून सायकल चालवत होता. हे माझ्या लक्षात आल्यावर मी त्याला सायकलच्या ‘हॅन्डल’च्या मध्ये बघून सरळ लक्ष ठेवायला सांगितले. त्याला जसे करून दाखवले, तसे तो करत होता. त्यामुळे तो एक दिवस १ घंटा आणि दुसर्‍या दिवशी १५ मिनिटे, एवढ्या अल्प वेळात सायकल चालवायला शिकला.

१०. ‘अग्निहोत्र करण्यात खंड पडू नये’, याची काळजी घेणे

‘विश्‍व अग्निहोत्रा’च्या दिवशी त्याला अग्निहोत्राचे शास्त्र सांगितले. त्या दिवसापासून तो नियमित अग्निहोत्र करतो. दळणवळण बंदी असल्यामुळे घरातील गोवर्‍या संपतील; म्हणून तो अग्निहोत्र करतांना गोवर्‍या काटकसरीने वापरतो. शेवटचे १५ दिवस तो गोवरीचे चिंचोक्याच्या आकाराचे ३ तुकडे वापरायचा; पण अग्निहोत्र करण्यात खंड पडू द्यायचा नाही.

११. स्वभावदोष

अव्यवस्थितपणा आणि घाईगडबड करणे.’

– सौ. सोनाली पोत्रेकर आणि श्री. रवींद्र पोत्रेकर (१०.६.२०२०)

यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक