काँग्रेससाठी आता पराभव सर्वसामान्य घटना ! – काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांची पक्ष नेतृत्वावर टीका

काँग्रेस आता भंगारात काढण्यासारखा पक्ष झाला आहे, हे त्यांच्या नेत्यांच्याही लक्षात आले आहे. त्यामुळे मोहनदास गांधी यांनी ७ दशकांपूर्वी सांगितलेली काँग्रेस विसर्जित करण्याचे मत काँग्रेसने आता स्वीकारून तिला विसर्जित करावे !

कपिल सिब्बल

नवी देहली – काँग्रेससाठी आता पराभव सर्वसामान्य घटनेसारखा झाला आहे. बिहार निवडणुका आणि इतर राज्यांतील पोटनिवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतरही काँग्रेसच्या नेतृत्वाविषयी अद्याप कोणताही विचार झालेला नाही. कदाचित् त्यांना असे वाटत असेल की, सगळे काही ठीक आहे आणि ही सामान्य घटना आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीयमंत्री कपिल सिब्बल यांनी स्वतःच्या पक्षाच्या नेतृत्वावर केली आहे. यापूर्वीही सिब्बल आणि अन्य काही नेत्यांनी पक्ष नेतृत्वात पालट करण्याविषयी पत्र लिहिले होते. बिहार निवडणुकीत ७० जागा लढवून काँग्रेसला अवघ्या १९ जागांवर समाधान मानावे लागले आहे. राजद आणि काँग्रेस यांच्यातील महाआघाडीत काँग्रेसची कामगिरी वाईट झाल्याने महाआघाडीला बहुमतापासून दूर रहावे लागले. यावरून सिब्बल यांनी ही टीका केली आहे.

 (सौजन्य : ABP NEWS)

एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत कपिल सिब्बल यांनी त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्‍नावर उत्तर देतांना म्हटले की, मी केवळ माझे वैयक्तिक मत मांडत आहे. मी नेतृत्वाला याविषयी काही बोलतांना (बाजू स्पष्ट करतांना) ऐकले नाही. माझ्याकडे नेतृत्वाविषयी लोकांचा आवाज पोचतो, मला केवळ तेवढेच ठाऊक असते.