हज यात्रेला जाण्यासाठी दाबोळी विमानतळ पुन्हा प्रारंभस्थळ बनवण्याची मुसलमान संघटनांची मागणी

वास्को, १५ नोव्हेंबर (वार्ता.)  – गोव्यातून हज यात्रेला जाणार्‍यांसाठी दाबोळी विमानतळ हे प्रारंभस्थळ बनवण्याचा प्रस्ताव रहित करण्याच्या केंद्रशासनाच्या निर्णयाचा अनेक मुसलमान संघटनांनी विरोध केला आहे. याविषयी काँग्रेस पक्षातील अल्पसंख्यांक गटाचे अध्यक्ष नाझीर खान म्हणाले, ‘‘दाबोळी विमानतळ हे प्रारंभस्थळ म्हणून रहित करणे, हे अन्यायकारक आहे. यामुळे गोवा आणि कर्नाटक राज्यांतील हज यात्रेकरूंना प्रवास करून महाराष्ट्रात जाऊन नंतर विमानयात्रेचा प्रारंभ करावा लागणार आहे, तसेच महाराष्ट्रात जाण्यासाठी ३-४ दिवस आधी प्रवास करावा लागणार आहे. याची गोवा राज्य हज समितीचे अध्यक्ष शेख जिना यांनी त्वरित नोंद घ्यावी आणि राज्य आणि केंद्र शासन यांच्यासमोर हा प्रश्‍न उपस्थित करून दाबोळी विमानतळ हे यात्रा प्रारंभ करण्याचे ठिकाण बनवावे. यापूर्वी राज्यशासनाने गोवा आणि शेजारील राज्यांतील हज यात्रेकरूंच्या सोयीसाठी दाबोळी विमानतळाजवळ ‘हज हाऊस’ स्थापन करण्याचे आश्‍वासन दिले होते; परंतु त्याची पूर्तता करण्यात आलेली नाही.’’

वास्को येथील सामाजिक कार्यकर्ते रियाझ कादरी यांनी प्रारंभीचे ठिकाण रहित केल्याविषयी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, ‘‘गोवा राज्य हज समितीचे अध्यक्ष शेख जिना हे केंद्रीय पातळीवरील अखिल भारतीय हज समितीचे प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे हज यात्रेचा प्रारंभ होण्याचे ठिकाण पुन्हा दाबोळी विमानतळ करण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. असे झाल्यास गोवा आणि कर्नाटक राज्यांतील हज यात्रेकरूंची गैरसोय होणार नाही. हज यात्रेकरूंच्या हितासाठी केंद्र आणि राज्य शासनांनी त्यांचा निर्णय पालटावा.’’