महिलांनो, नवरात्रात विविध रंगांच्या साड्या नेसून नव्हे, तर देवीविषयीचा शुद्ध सात्त्विक भाव जागृत करून तिची कृपा संपादन करा !

‘नवरात्रीच्या नऊ दिवसांत प्रत्येक दिवशी ठराविक रंगाची साडी नेसावी’, असा प्रचार सर्वत्र होतो. ‘यामागे नक्की कोणते ज्योतिषशास्त्रीय कारण आहे ?’, असा प्रश्‍न अनेकांनी विचारला. काही स्त्रियांनी ‘माझ्याकडे या रंगाची साडी नसल्याने देवी मला प्रसन्न होणार नाही का ? माझे व्रत मोडले जाईल का ? देवीचा कोप होईल का ?’, असे अनेक प्रश्‍न विचारले. अशा प्रश्‍नांतून स्त्रियांच्या मनात देवीच्या भक्तीपेक्षा भीती अधिक जाणवली. ‘नवरात्रीचा उत्सव भक्तीमय असावा, तो भीतीमय नसावा’, असे वाटते.

सौ. प्राजक्ता जोशी

प्रत्यक्षात देवतांची पूजा करताना ‘धूत वस्त्र’ म्हणजे ‘स्वच्छ धुतलेले वस्त्र’ परिधान करावे. ‘अमुक एका रंगाचे वस्त्र घालावे’, असा उल्लेख कोणत्याही धार्मिक ग्रंथात नाही. ज्यांना शक्य आहे, त्यांनी विविध रंगांच्या साड्या नेसाव्यात; परंतु ज्यांना शक्य नाही, त्यांनी कोणत्याही रंगाचे धूत वस्त्र वापरावे. ठराविक रंगाची साडी नेसता आली नाही, तर देवीचा कोणताही कोप होत नाही; कारण देवी-देवतांना भक्ताच्या मनातील शुद्ध सात्त्विक भाव अधिक प्रिय असतो.

प्रतिपदेपासून नवरात्रीपर्यंत नऊ दिवस देवीच्या नऊ रूपांची पूजा करतात, १. शैलपुत्री, २. ब्रह्मचारिणी, ३. चंद्रघंटा, ४. कूष्मांड, ५. स्कंदमाता, ६. कात्यायनी, ७. कालरात्री, ८. महागौरी, ९. सिद्धीदात्री, अशी देवीची नऊ रूपे आहेत. अखंड नंदादीप प्रज्वलित करून आदिमायेची नऊ दिवस मनोभावे पूजा करतात. नवरात्रकाळात ‘कुंकूमार्चन करणे, देवी माहात्म्य वाचणे, देवीला फुलांच्या माळा घालणे, सप्तशती ग्रंथाचे वाचन करणे’, यांना विशेष महत्त्व आहे.

नवरात्रीत ‘श्रवण, कीर्तन, स्मरण, वंदन, अर्चन, पादसेवन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन’ या नवविधा भक्तीने देवीला अनन्यभावाने शरण जाऊया. ‘नवरात्रीत नऊ दिवस नऊ रंगांच्या साड्या नेसणे’, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे’, असे नाही. देवी-देवता व्यक्तीच्या बाह्य रंगाने नाही, तर अंतर्मनातील शुद्ध सात्त्विक भक्तीने प्रसन्न होतात. देव भावाचा भुकेला असतो. ‘प्रत्येकाने शरणागतभावाने अंतःकरणपूर्वक देवीची भक्तीभावाने उपासना करून धर्मपालन करणे’, हीच खरी देवीची उपासना आहे.

देवीने अनेक असुरांचा नाश केला आहे. वाईट विचारांचा आणि अपप्रचारांचा निर्भयतेने नाश करून भक्ती वाढण्यासाठी देवीला प्रार्थना करूया. धर्मग्रंथ आणि पुराणे यांनुसार श्री दुर्गादेवीची उपासना करण्यासाठी शारदीय नवरात्र हा उत्तम काळ आहे.’

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्‍लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, फोंडा, गोवा. (१३.१०.२०२०)