गुजरात उच्च न्यायालयाच्या कामकाजाची तुलना जुगाराच्या अड्डयाशी करणार्‍या अधिवक्त्यावर कारवाई

अधिवक्ता यतिन ओझा

कर्णावती (गुजरात) – गुजरात उच्च न्यायालयाने येथील अधिवक्त्यांच्या संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता यतिन ओझा यांच्यावर न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणी कारवाई करत त्यांची ज्येष्ठता रहित केली. उच्च न्यायालयाच्या पूर्ण पिठाने आदेश देतांना सांगितले की, ‘२५ ऑक्टोबर १९९९ या दिवशी त्यांना दिलेला वरिष्ठ अधिवक्ता हा दर्जा रहित करण्यात येत आहे.’

१. अधिवक्ता ओझा यांनी दळणवळण बंदीच्या काळात एका ‘ऑनलाईन’ पत्रकार परिषदेत म्हटले होते की, ‘उच्च न्यायालय आता जुगार्‍यांचा अड्डा बनला आहे, जेथे श्रीमंत उद्योगपती, बांधकाम व्यावसायिक आणि तस्कर केवळ २ दिवसांत न्याय मिळवतात. करोडपतीच असा जुगार खेळू शकतात. गरीब तर न्यायासाठी चकरा मारत रहातात.’

२. अधिवक्ता ओझा यांचा आरोप होता की, ‘न्यायालयातील निबंधक केवळ काही ज्येष्ठ अधिवक्त्यांचे खटले सुनावणीसाठीच्या सूचीत ठेवतात. कनिष्ठ अधिवक्त्यांचे खटले त्यांच्या सूचीमध्ये येतच नाहीत. हे जुगाराच्या अड्डयाप्रमाणे कामकाज चालत आहे.’

३. गुजरात उच्च न्यायालयाने या विधानांची नोंद घेत त्यांना नोटीस पाठवली होती. त्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

४. वर्ष १९९५ मध्ये अधिवक्ता ओझा यांनी कर्णावती येथील साबरमती मतदारसंघात  भाजपकडून निवडणूक लढवून माजी उपमुख्यमंत्री नरहरि अमीन यांना पराभूत केले होते. भाजपशी वाद झाल्यावर ते काँग्रेसमध्ये गेले. वर्ष २००२ मध्ये ते मणीनगर येथील विधानसभा निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विरोधात उभे राहिले होते.