अकबर बलात्कारी होता, तर औरंगजेबाने शेकडो मंदिरे पाडली !- Rajasthan Education Minister

राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी विधानसभेत केली मोगलांची चिरफाड !

राजस्थानचे शिक्षणमंत्री मदन दिलावर व मोगल बादशाहा अकबर

जयपूर (राजस्थान) – ‘मीना बाजार’ (मोगल काळातील केवळ महिलांसाठीचा बाजार) उभारणारा मोगल बादशाहा अकबर बलात्कारी, आक्रमणकर्ता आणि लुटारू होता. त्याला ‘महान’ म्हटले जात असे. औरंगजेबाने असंख्य हिंदूंची हत्या केली, शेकडो मंदिरे पाडली आणि हिंदूंवर जिझिया कर लादला. हा देशाचा आणि आपल्या महापुरुषांचा अपमान होता. हे सहन करता येणार नाही, असे विधान राजस्थानचे भाजप सरकारमधील शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी विधानसभेत केले. दिलावर यांनी यापूर्वीही अकबर याच्यावर अशाच प्रकारचे विधान केले होते.

अकबर तुमचा कोण लागतो ? – दिलावर यांचा विरोधी पक्षांच्या आमदारांना प्रश्न

दिलावर यांच्या या विधानाला विरोधी पक्षाच्या काही आमदारांनी आक्षेप घेतल्यावर शिक्षणमंत्री दिलावर यांनी त्यांना विचारले की, अकबर तुमचा कोण लागतो ? मोगल बादशाहांचे क्रौर्य देशातील विद्यार्थ्यांपासून लपवून ठेवण्यात आले होते. हे अनेक वर्षांपासून पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवले जात होते. आक्रमक आणि क्रूर शासक तैमूरचे वर्णन ‘महान’ असे केले गेले. हे पूर्णपणे चुकीचे होते. महापुरुषांबद्दल मागील सरकारांनी जे शिकवले त्याबद्दल आम्हाला पुष्कळ दुःख झाले आहे. त्याने महाराणा प्रताप यांच्या शौर्याला तुच्छ लेखण्याचा प्रयत्न केला.

शाळेच्या वेळेत कोणतेही धार्मिक कार्यक्रम होणार नाहीत !

शिक्षणमंत्री मदन दिलावर यांनी सांगितले की, मदरसा बोर्डात गणवेश लागू केला जाईल. शाळेच्या वेळेत कोणतेही धार्मिक कार्यक्रम होणार नाहीत, मग ते नमाज असो किंवा श्री बालाजीची पूजा असो. तसेच महाराणा प्रताप यांचे जीवन आणि योगदान शाळांमध्ये शिकवले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

संपादकीय भूमिका

असा खरा इतिहास किती शिक्षणमंत्री या देशात सांगतात ? हा इतिहास शालेय पुस्तकांतून कधी शिकवला जाणार ?