
लंडन (ब्रिटन) – युक्रेनच्या सुरक्षेसाठी येथे आयोजित पात पडलेल्या बैठकीत युरोपीय देशांच्या प्रमुखांनी ‘आता युरोप स्वबळावर स्वत:चे संरक्षण करेल’, असे घोषित केले. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या पुढाकाराने एकत्र जमलेल्या युरोपीय देशांच्या नेत्यांनी संरक्षणासाठीची तरतूद वाढवण्यावर सहमती दर्शवली. या वेळी ब्रिटनने युक्रेनला शस्त्रास्त्र खरेदीसाठी युरोपीय निधीतून ४० सहस्र कोटी रुपयांचे साहाय्य दिले. यातून ५ सहस्र क्षेपणास्त्रांची खरेदीही केली जाऊ शकते. भविष्यातही साहाय्य केले जाईल, अशी हमी त्यांनी दिली.
१. रशिया-युक्रेन युद्ध रोखण्यासाठी शांतता प्रस्ताव आणला जाईल. त्यात ब्रिटन, फ्रान्स आणि युक्रेन यांचा समावेश असेल. हा प्रस्ताव अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनाही पाठवला जाईल. शांती प्रक्रियेत अमेरिकाही सहभागी व्हावी, असे युरोपला वाटते.
२. ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर म्हणाले की, युक्रेनमध्ये युद्धबंदी लागू करण्यासाठी युरोपचे संयुक्त सैन्यदल सिद्ध केले जाऊ शकते.
३. जर्मन चान्सलर ओलाफ शुल्ज म्हणाले की, युक्रेन ३ वर्षांपासून रशियाच्या आक्रमणाला तोंड देत आहे. युक्रेनला इतके सक्षम करावे लागेल की, तो युद्धविरामाने दबणार नाही.
४. फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन म्हणाले की, युरोपला स्वतःच्या सुरक्षेसाठी पूर्वीच सतर्क होणे आवश्यक होते, हे मी अनेक वर्षांपासून सांगत आहे.
५. पोलंडचे पंतप्रधान डॉनल्ड टस्क यांनी सांगितले की, ५० कोटी युरोपीय लोक ३० कोटी लोकसंख्येच्या अमेरिकेकडे याचना करत आहेत की, रशियाच्या १४ कोटी लोकांकडून आमचे संरक्षण करा. आपण आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहोत म्हणून नव्हे, तर आपला स्वत:वर विश्वास नाही. आपल्याला स्वतःची क्षमता ओळखून पुढे जावे लागेल. युरोप रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यासमोर झुकणार नाही.
संपादकीय भूमिकायुरोप किती वर्षे युक्रेनला साहाय्य करू शकणार आहे ? तोही नंतर अमेरिकेप्रमाणेच युक्रेनमधील मौल्यवान खनिजांवर दावा करणार आहे, हे निश्चित ! |