बांदिवडे, फोंडा (गोवा) येथील सनातनच्या साधिका सौ. ज्योती सुदिन ढवळीकर (वय ६२ वर्षे) या ७२ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून १३२ व्या संत झाल्याची घोषणा २४ फेब्रुवारी २०२५ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या एका अनौपचारिक सोहळ्यात करण्यात आली. या वेळी पू. (सौ.) ज्योती ढवळीकर यांच्या साधनेचे प्रयत्न जाणून घेण्यासाठी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत पू. (सौ.) ढवळीकर यांनी सांगितलेले त्यांच्या साधनाप्रवासातील प्रसंग येथे दिले आहेत.

१. कठीण प्रसंग येऊनही साधना न सोडणे
‘सनातन संस्थेवर ओढवलेल्या एका कठीण प्रसंगानंतरही देवाने साधनेत टिकवून ठेवले. त्या वेळी ‘साधना सोडावी’, असा विचार अथवा साधनेविषयी किंतु-परंतु कधीच मनात आला नाही. अनेक जण आम्हाला साधना सोडायला सांगायचे; परंतु घरातील कुणीही कधी साधना सोडायला सांगितली नाही. कुटुंबियांमुळेच आम्ही (मी आणि सौ. लता (पू.(सौ.) ज्योती ढवळीकर यांच्या जाऊबाई सौ. लता ढवळीकर, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) साधना करू शकत आहोत. त्यासाठी कुटुंबियांप्रतीही मी कृतज्ञ आहे.
२. निवडणुकीच्या वेळी प्रचाराला जातांना करत असलेले भावप्रयत्न
यजमान निवडणुकीला उभे राहिले, तेव्हा त्यांचा प्रचार करण्यासाठी मतदारसंघातील गावांमध्ये जावे लागत असे. तेव्हा कार्यकर्त्यांसह वाड्यावरील मुख्य मंदिरात देवाला नारळ अर्पण करून त्याचा जयघोष करून प्रचार करत असू. प्रचार करतांना ‘श्री महालक्ष्मीदेवीचेच चैतन्य मी लोकांपर्यंत पोचवत आहे’, असा भाव मी ठेवत असे.
३. प्रतिष्ठित आणि राजकीय कुटुंबातील असूनही अहं नसणे अन् त्याही परिस्थितीत साधना करत स्थिर रहाणे
घरातील राजकीय वातावरणातील त्या परिस्थितीतही साधना कशी करायची ? हे मला शिकायला मिळाले. यजमान राजकारणात असल्याने अनेक लोकांचे घरी येणे-जाणे असते. सर्व प्रकारच्या लोकांमध्ये रहावे लागत असल्याने स्वतःचे वेगळेपण असे कधी वाटलेच नाही. लोक जसे चांगले बोलतात, तसेच तक्रारी करतात आणि वाईटही बोलतात. सर्व प्रसंगांत शांत राहून त्यांचे ऐकून प्रेमानेच बोलावे लागायचे. याचाही साधनेत मला लाभ झाला. सर्व प्रकारच्या परिस्थितींमध्ये मला साधनेमुळे स्थिर रहाता आले.’
– (पू.) सौ. ज्योती ढवळीकर, बांदिवडे, फोंडा, गोवा. (२४.२.२०२५)