Raksha Khadse’s Daughter Molested : जळगाव येथे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढली !

  • सुरक्षारक्षक असतांनाही झाली घटना

  • १ अटकेत, ४ जण फरार

  • आरोपी हे विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

केंद्रीय मंत्री रक्षा खडसे

जळगाव – केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणी सुरक्षारक्षकासह मुक्ताईनगर येथील एका जत्रेत गेल्या होत्या. तेथील टवाळखोर मुलांनी त्यांचा व्हिडिओ काढला. त्यांना धक्काबुक्की करत त्यांची छेड काढली. या प्रकरणी ५ जणांच्या विरोधात पॉक्सोअंतर्गत विनयभंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यात अनिकेत भोई याला अटक करण्यात आली असून पियुष मोरे, सोहम माळी, अनुज पाटील आणि किरण माळी हे सर्वजण फरार आहेत. पोलिसांनी अद्याप अटकेची कारवाई केलेली नसल्याने या मागणीसाठी रक्षा खडसे यांना स्वतःला पोलीस ठाण्यात जावे लागले.

आरोपींवर कडक कारवाई होईल ! – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,

‘‘या प्रकरणातील आरोपींना क्षमा करता कामा नये. त्यांच्यावर कडक कारवाई होईल. हे आरोपी म्हणजे विशिष्ट पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी असल्याचे समजते.’’

एकनाथ खडसे

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते आणि केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथ खडसे म्हणाले, ‘‘पोलिसांचा धाकच राहिलेला नाही. स्थानिक गुंडांना लोकप्रतिनिधींपासून संरक्षण मिळत आहे, हे गंभीर आहे.’’

रोहिणी खडसे

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या संदर्भात असे घडत असेल, तर सर्वसामान्य महिलांना न्याय मिळणार कसा ? केंद्रीय मंत्र्यांना कारवाईच्या मागणीसाठी स्वतः पोलीस ठाण्यात जावे लागले. याचा अर्थ गृहखाते अपयशी ठरत आहे.’’

महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर म्हणाल्या, ‘‘दोषींवर कारवाई केली जाईल.’’

संपादकीय भूमिका

जर सुरक्षारक्षक असतांनाही केंद्रीय मंत्र्यांच्या लेकीबाळी असुरक्षित असतील, तर सामान्य मुली, तरुणी आणि महिला यांच्या सुरक्षेचे कोण पहाणार ?