Raja Bhaiya Appeals To Hindus : गोध्रा हत्याकांडाचा संदर्भ देत आमदार राजा भैय्या यांच्याकडून हिंदूंना एकजूट होण्याचे आवाहन !

मुख्यमंत्री योगी यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ या वक्तव्याचा पुनरुच्चार !

आमदार रघुराज प्रताप सिंह उपाख्य राजा भैय्या

कुंडा (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशमधील प्रतापगड जिल्ह्यातील कुंडा मतदारसंघाचे आमदार रघुराज प्रताप सिंह उपाख्य राजा भैय्या यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ (विभागलो गेलो, तर कापले जाऊ) या वक्तव्याचा पुनरुच्चार करत हिंदूंना एकजूट होण्याचे आवाहन केले. राजा भैय्या यांनी २३ वर्षांपूर्वीच्या गुजरातमधील गोध्रा हत्याकांडाचा संदर्भ देत सांगितले की, जेव्हा साबरमती एक्स्प्रेस गाडी जाळण्यात आली, तेव्हा ती जाळणार्‍यांनी उच्चवर्णीय, मागास किंवा दलित असे काही पाहिले नाही.

१. राजा भैय्या यांनी ‘एक्स’वर लिहिले की, २७ फेब्रुवारी २००२ या दिवशी साबरमती एक्स्प्रेसमध्ये श्रीरामभक्तांना जिवंत जाळण्यात आले होते. मुसलमानांच्या लेखी त्या श्रीरामभक्तांचा ‘गुन्हा’ इतकाच होता की, ते  श्रीरामलल्लाचे दर्शन घेऊन अयोध्येतून परत येत होते.

२. त्यांनी पुढे लिहिले आहे की, आक्रमणकर्त्यांनी महिला, पुरुष किंवा लहान मुले कुणालाही सोडले नाही. जगाच्या इतिहासात कोणत्याही राष्ट्रात अल्पसंख्याकांनी बहुसंख्य समाजावर केलेल्या अशा अमानुष नरसंहाराचे दुसरे उदाहरण शोधूनही सापडणार नाही.

३. २७ फेब्रुवारी २००२ या दिवशी गुजरातमधील गोध्रा स्थानकातून निघालेली साबरमती एक्स्प्रेस मुसलमान जमावाने पेटवून दिल्याने ५९ हिंदु यात्रेकरूंचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे गुजरातमध्ये जातीय दंगली उसळल्या होत्या.