वाशी येथे ‘भक्‍ती शक्‍ती रेल्‍वे प्रवासी भजन स्‍पर्धा’ पार पडली

वाशी रेल्‍वे स्‍टेशन ते सिडको ऑडिटोरियम दरम्‍यान दिंडी काढण्‍यात आली

नवी मुंबई – वाशी येथे विठूमाऊलीच्‍या गजरात ‘भक्‍ती शक्‍ती रेल्‍वे प्रवासी भजन स्‍पर्धा’ पार पडली. ‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्‍था’चे संस्‍थापक अध्‍यक्ष आणि माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्‍या पुढाकाराने छत्रपती शिवराय भजन मंडळ, वाशी, श्री संत तुकाराम महाराज रेल्‍वे प्रवासी भजन मंडळ, वाशी आणि संलग्‍न नवविधा भक्‍ती सेवा समिती हार्बर लाईन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने या स्‍पर्धेचे आयोजन करण्‍यात आले होते. या स्‍पर्धेत २२ भजनी मंडळे सहभागी झाली होती. भजनी परंपरेतून सामाजिक दायित्‍व जपणारी रेल्‍वे प्रवासी भजन मंडळे या स्‍पर्धेत सहभागी होऊन नामस्‍मरण आणि संतवाणी यांच्‍या माध्‍यमातून वातावरण भक्‍तीरसात न्‍हाऊन निघाले होते. या नामसंकीर्तन सोहळ्‍यास वनमंत्री गणेश नाईक हे प्रमुख पाहुणे म्‍हणून उपस्‍थित होते. त्‍यांच्‍याकडे प्रवासी भजनी मंडळांनी निवेदनाद्वारे समस्‍या मांडल्‍या. त्‍यावर तोडगा काढण्‍याचे आश्‍वासन नाईक यांनी दिले. या स्‍पर्धेला परीक्षक म्‍हणून नवी मुंबईकर असलेल्‍या संगीत विशारद आणि गायनचार्या ह.भ.प. पूर्वाताई पाटील आणि संगीत विशारद ह.भ.प किरण महाराज पाटील यांनी सेवा दिली.

सकाळी ७ वाजता वाशी रेल्‍वे स्‍टेशन येथे सी एस टी कडे जाणार्‍या रेल्‍वेचे पुजन वा मोटरमन यांचा सन्‍मान करून, वाशी रेल्‍वे स्‍टेशन ते सिडको ऑडिटोरियम दरम्‍यान दिंडी काढण्‍यात आली होती. या दिंडीत भाविक मोठया संख्‍येने सहभागी झाले होते.

या वेळी दशरथ भगत म्‍हणाले की, भजनातून प्रवाशांचा प्रवास सुखद व्‍हावा हीच भावना या रेल्‍वे प्रवासी भजनी मंडळांची असते. भजनातून मागील ५० वर्षाहून अधिक काळ २६१ भजन मंडळांकडून प्रार्थना केली जात आहे. ही भजन मंडळे अध्‍यात्‍मातून सकारात्‍मक आचार-विचार, नशामुक्‍ती आणि रेल्‍वे स्‍वच्‍छता अशा परिवर्तनरुपी समर्पित समाजसेवेद्वारे संपूर्ण रेल्‍वे यंत्रणेला संरक्षण कवच निर्माण करीत आहेत.

या वेळी व्‍यासपीठावर स्‍पर्धेचे संयोजक निशांत भगत, संदिप भगत, ज्ञानेश्‍वर माऊली भजनी सामाजिक संस्‍था या तीनही रेल्‍वे लाईन्‍स वरील भजनी मंडळाच्‍या शिखरस संस्‍थेचे अध्‍यक्ष ह.भ.प हनुमंत महाराज तावरे, अनिल महाराज मोरे, ह.भ.प राम महाराज रांजणे हे उपस्‍थित होते.