दोडामार्ग तालुक्यात अवेळी मुसळधार पाऊस

दोडामार्ग – तालुक्यात २३ फेब्रुवारी या दिवशी अनेक ठिकाणी ढगांचा गडगडाट आणि सोसाट्याचा वारा यांसह पाऊस पडला. यामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. केर गावात मोठ्या प्रमाणात गाराही पडल्या. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असला, तरी शेतकरी आणि
बागायतदार यांची लाखो रुपयांची हानी झाली आहे.

वातावरणातील पालटामुळे मागील काही दिवसांपासून वातावरणातील उष्मा वाढला होता. उष्म्यामुळे तालुकावासीय हैराण झाले होते. गेल्या ४ दिवसांपासून दुपारच्या सत्रात ढग दाटून येत होते. त्यामुळे उकाडा अधिकच वाढत होता. २३ फेब्रुवारीला सायंकाळी पाऊस पडू लागला. सोसाट्याच्या वार्‍यामुळे तालुक्यातील काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.