कामावर निष्काळजीपणा करणार्‍या ४-५ रुग्णवाहिका चालकांना निलंबित करणार ! – विश्वजित राणे

पणजी, २३ फेब्रुवारी (वार्ता.) – कामावर निष्काळजीपणा करणार्‍या उत्तर गोव्यातील ४-५ रुग्णवाहिका चालकांना निलंबित करण्यात येईल, असे वक्तव्य आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी २२ फेब्रुवारी या दिवशी केले. नुवे येथील एका वैद्यकीय शिबिराच्या वेळी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ‘‘असे लोक सरकारी सेवेत रहाण्याच्या योग्यतेचे नाहीत. हे लोक रुग्णवाहिका नीट हाताळत नाहीत. याविषयी अधिक उत्तरदायित्व येण्यासाठी अशा प्रकारच्या आणीबाणीच्या सेवेतील कर्मचारी भाडेतत्त्वावर नियुक्त केले पाहिजेत. ते नियमित सरकारी कर्मचारी असू नयेत. असे झाले, तरच रुग्णवाहिकेविषयी उत्तरदायित्व राहील. नाहीतर नेहमी रुग्णवाहिका उशिरा पोचल्याच्या तक्रारी येतात. (भाडेतत्त्वावर नियुक्त केलेल्यांमध्ये उत्तरदायित्व असते, तसे सरकारी कर्मचार्‍यांमध्ये का नसते ? अशा कर्मचार्‍यांमुळेच सरकारी कारभारावर टीका होते ! सरकारी नोकरी ही राष्ट्राची सेवा आहे, या भावनेने केली, तर ती योग्यरित्या होईल. म्हातारपणी निवृत्तीवेतन मिळते आणि काम
योग्यरित्या करत नाही म्हणून नोकरीवरून कुणी काढून टाकणार नाही, ही शाश्वती असल्यामुळे अनेक जणांना सरकारी नोकरी पाहिजे असते; पण यामुळे ‘सरकारी काम, १२ महिने थांब !’, अशी स्थिती झाली आहे ! – संपादक) १०८ रुग्णवाहिकांच्या संख्येमध्ये वाढ करण्यासंबंधी सरकार विचार करत आहे. यामुळे रुग्णवाहिकेची घटनेला प्रतिसाद देण्याची वेळ ७ मिनिटांपर्यंत न्यून करता येईल, तसेच गोव्यातील ग्रामीण भागांतील लोकांसाठी फिरती चिकित्सालये चालू करण्याचा विचार आहे. या प्रकल्पाविषयी मी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. अशा प्रकारच्या शिबिरांमुळे पडताळणीसाठी पैसे लागतात, हा अडथळा दूर होतो.’’