
मालवण – कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणार्या तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री भराडीदेवीच्या जत्रेला २२ फेब्रुवारी या दिवशी प्रारंभ झाला होता. २३ फेब्रुवारी या दिवशी मोड यात्रेने या जत्रेची सांगता झाली. यात्रेच्या २ दिवसांच्या कालावधीत लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले.
२२ फेब्रुवारीला सकाळी देवीचे दर्शन चालू झाले होते, ते रात्री ९ वाजता थांबवण्यात आले. त्यानंतर गावातील सुवासिनींनी घरी बनवलेला महाप्रसाद देवीला दाखवला. याला ‘ताटे लावणे’ असे म्हणतात. त्यानंतर देवीच्या दर्शनाला पुन्हा प्रारंभ करण्यात आला. देवीला महाप्रसाद अर्पण केल्यानंतर सुवासिनी महिला घरी आल्या. त्यानंतर उपस्थित भाविकांना आंगणे कुटुंबियांच्या घरी महाप्रसाद देण्यात आला. या जत्रोत्सवात कपडे, चादरी, खेळणी, शेतीची अवजारे, मिठाई, खाद्यपदार्थ, यांसह विविध स्टॉल होते, तसेच हॉटेल व्यावसायिकांचेही कक्ष होते. सनातन संस्थेचे ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे कक्षही येथे लावण्यात आले होते. त्याला भाविकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
श्री भराडीदेवीची जत्रा सुरळीत पार पडावी, यासाठी आंगणे कुटुंबियांच्या वतीने पोलीस, जिल्हा प्रशासन, वीजवितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग आदी प्रशासकीय विभाग आणि अन्य सर्वांचे आभार व्यक्त करण्यात आले.
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या विशेषांकाचे प्रकाशन
श्री भराडीदेवीच्या जत्रोत्सवानिमित्त दैनिक ‘सनातन प्रभात’ने विशेषांक प्रसिद्ध केला होता. या विशेषांकाचे प्रकाशन श्री. रमेश आंगणे, श्री. प्रफुल्ल आंगणे आणि आंगणेवाडी विकास मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. सिताराम (बाळा) आंगणे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सनातन संस्थेचे साधक श्री. दिनानाथ गावडे यांच्यासह अन्य उपस्थित होते.