
राजापूर – रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जातीय सलोखा राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, तसेच सामाजिक माध्यमे आणि वृत्तपत्रे यांमध्ये आक्षेपार्ह दृश्ये, छायाचित्र, व्हिडिओ किंवा कोणत्याही स्वरूपाच्या अफवा पसरवू नयेत, असे आवाहन रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी नागरिकांना केले आहे.
जिल्ह्यात जातीय सलोखा कायम रहावा, यासाठी सामाजिक माध्यमांवर (सोशल मीडियावर) सायबर पोलिसांकडून २४ घंटे लक्ष ठेवण्यात येत आहे. सामाजिक माध्यमांतून कोणत्याही धर्माबद्दल आक्षेपार्ह चित्र, पोस्ट, अफवा, चुकीचे संदेश, आक्षेपार्ह संदेश किंवा व्हिडिओ प्रसारित केल्यास पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येणार आहे. सोशल मीडियावर प्रसारित करण्यात येणार्या पोस्ट आणि वृत्तपत्रांमध्ये प्रसारित केल्या जाणार्या बातम्या या प्रसारित करण्यापूर्वी संबंधित विभागाकडून खात्री करूनच प्रसारित करण्यात याव्यात, अशी सूचनाही जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्याकडून देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये अथवा त्यांना बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक कुलकर्णी केले आहे.