सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा दैवी दौरा !

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या एक आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि सनातनच्या संत पू. दीपाली मतकर यांनी ९ फेब्रुवारी २०२५ या दिवशी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवीचे भावपूर्ण दर्शन घेतले. या वेळी या दोघींच्या वंदनीय उपस्थितीत श्री तुळजाभवानी मंदिरात पारंपरिक पद्धतीने पूजा विधी, गोंधळ, तसेच अन्य धार्मिक विधी करण्यात आले. या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि पू. दीपाली मतकर यांनी श्री भवानीदेवीच्या चरणी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेतील सूक्ष्मातील सर्व अडथळे दूर होऊन लवकरात लवकर हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ दे, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना उत्तम आरोग्य लाभू दे’, अशी प्रार्थना केली. सर्व पूजाविधी पार पडल्यानंतर महाआरती करण्यात आली.

या वेळी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी मंदिर परिसरातील श्री भवानीशंकर, होमकुंड, श्री कल्लोळतीर्थ, श्री गोमुखतीर्थ आणि श्री तुळजाभवानी मंदिर, खुर्द तुळजापूर येथेही प्रत्यक्ष जाऊन भावपूर्ण दर्शन घेतले. या प्रसंगी तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे, भोपे पुजारी श्री. अमित कदम आणि सनातनचे साधक उपस्थित होते.
वैशिष्ट्यपूर्ण
श्री तुळजाभवानीदेवीच्या क्षेत्री श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि पू. दीपाली मतकर यांना पाहून उपस्थित साधकांचा भाव जागृत झाला, तसेच त्यांच्या माध्यमातून साक्षात् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचेच तुळजापूर येथे आगमन झाल्याची अनुभूती अनेक साधकांना आली.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |