Maha Kumbh Parva : आतापर्यंत जगातील ५० टक्के हिंदूंनी महाकुंभपर्वात केले स्नान !

महाकुंभपर्वात स्नान करणार्‍या भाविकांची संख्या ६० कोटींहून अधिक !

प्रयागराज – जगातील सर्वांत मोठा धार्मिक सोहळा असलेल्या येथील महाकुंभपर्वात आतापर्यंत ५० टक्के हिंदूंनी स्नान केले आहे. ‘वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यू’ आणि ‘प्यू रिसर्च’नुसार भारताची अंदाजे लोकसंख्या १४३ कोटी (१.४३ अब्ज) आहे. यांमध्ये सनातन धर्माचे पालन करणार्‍यांची संख्या अनुमाने ११० कोटी (१.१० अब्ज) आहे. यासह संपूर्ण जगभरातील सनातन धर्माचे पालन करणार्‍यांची एकूण संख्या १२० कोटी इतकी आहे. महाकुंभपर्वात स्नान करणार्‍या भाविकांच्या संख्येची जगभरातील सनातन धर्माचे पालन करणार्‍यांच्या संख्येशी तुलना केली, तर आतापर्यंत ५० टक्क्यांहून अधिक लोकांनी पवित्र त्रिवेणी संगमात स्नान केले आहे.

देशाच्या एकूण लोकसंख्येशी स्नानार्थींची तुलना केली, तर हे प्रमाण ५५ टक्के इतके आहे, म्हणजेच देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ५५ टक्क्यांहून अधिक लोकांनी त्रिवेणी संगममध्ये स्नान केले आहे. १३ जानेवारीपासून चालू झालेल्या महाकुंभपर्वात २२ फेबु्रवारीपर्यंत ६० कोटींहून अधिक भाविकांची संगमस्नान केले आहे.

सरकारने संपूर्ण महाकुंभपर्वात ४० कोटी भाविक येण्याचा अंदाज वर्तवला होता; परंतु सरकारच्या या अंदाजापेक्षा हा आकडा तब्बल २० कोटींनी अधिक आहे. अजूनही येथे प्रतिदिन सवा ते दीड कोटी भाविक स्नान करत आहेत. महाशिवरात्रीला महाकुंभपर्वाची सांगता होणार आहे. तोपर्यंत भाविक येथे प्रतिदिन याहून अधिक संख्येने स्नानासाठी येतील आणि महाशिवरात्रीच्या दिवशी असलेल्या पर्वस्नानाच्या दिवशी सर्वाधिक संख्येने भाविक स्नानासाठी येतील, असा अंदाज आहे.