।। श्रीकृष्ण ।।

कु. गायत्री बागल यांनी विचारलेला प्रश्न : योग्य आणि अयोग्य यांमधील भेद बुद्धीला कळल्यावर कार्यरत असलेल्या मनाला बुद्धी सूचित करते; पण मनावर अयोग्य गोष्टींचा संस्कार तीव्र असल्याने बुद्धीने योग्य जाणीव करून देऊनही मन ते स्वीकारत नाही. जेवढे अधिक स्वभावदोष, तेवढे मनाला बुद्धीचे योग्य ऐकण्याची सवय लावणे कठीण जाते. ‘असे होऊ नये’, यासाठी स्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. बुद्धीचे योग्य ऐकण्याची सवय लागल्याने स्वभावदोष आणि अहं न्यून होऊ लागतात अन् मनाला हलकेपणा जाणवून मनोलय होऊ लागतो. पू. काका, हे योग्य आहे का ?

पू. भाऊकाका (अनंत आठवले) ह्यांचे उत्तर : तुम्ही लिहिले आहे ते बरोबर आहे (पण हा मनोलय नाही). आणखी असे की योग्य काय आणि अयोग्य काय हे प्रत्येक वेळेला बुद्धीला कळतेच असे नाही, आणि कळले तरी वळतेच असे नाही. उदा. चोराच्या बुद्धीला हे माहित असते की चोरी करणे चुकीचे आहे, तरी सुद्धा तो चोरी करतो. मनात वाईट विचार येऊ शकतात, पण ते केवळ विचारच असतात. तो चोरी करण्याचा निर्णय मनाचा नसतो, तर बुद्धीचा असतो. तेव्हा बुद्धी योग्य काय ते सांगते पण स्वभावदोषांमुळे मन ते ऐकत नाही, असे नाही. तसेच आपल्यात स्वभावदोष आहेत हे ओळखणे आणि मानणे कठीण जाते. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षडरिपू आणि ममता, अहंकार हे सर्व दोष बुद्धीलाच ग्रासतात. त्यांच्या मुळाशी आपल्या ‘इच्छा’ असतात. कामना, इच्छा, हे सर्व अनर्थाचे मूळ आहे. सर्वांचीच बुद्धी काय योग्य, काय अयोग्य आहे हे ठरवण्यास समर्थ नसते. त्यामुळे अनेकानेक वेळा बुद्धिमान मनुष्यसुद्धा चुकीचे निर्णय घेत असतो. म्हणून भगवान् श्रीकृष्णांनी भगवद्गीतेत सांगितले आहे –
तस्माच्छास्त्रं प्रमाणं ते कार्याकार्यव्यवस्थितौ ।
ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि ।। – श्रीमद्भगवद्गीता, अध्याय १६, श्लोक २४
अर्थ : म्हणून काय करायचे आणि काय करू नये हे ठरविण्यात तुला शास्त्र हे प्रमाण असले पाहिजे. शास्त्राने निश्चित केलेले कर्म जाणून तू तसे कर्म करणे योग्य आहे.
योग्य कर्मे कोणती, ते सनातन धर्मशास्त्र सांगते. ‘धर्म’ म्हणजे मुख्यतः आचरणाचे नियम. ह्यात दोन प्रकार असतात. विधी आणि निषेध. विधी म्हणजे काय करायचे ते. उदा. शास्त्राभ्यास, दानधर्म, दुसर्यांची सहायता, व्यवहार सचोटीने करणे, पूजापाठ इत्यादी. निषेध म्हणजे काय करू नये ते. उदा. चोरी करू नये, दुसर्यांना त्रास देऊ नये, दारू पिऊ नये, दुसर्यांचा अपमान करू नये इत्यादी. ह्यांना चांगले संस्कार असेही म्हणतात आणि ते गुरूंकडून सुद्धा मिळतात. सनातन धर्मशास्त्राचे हे जे आचरणाविषयी मार्गदर्शन आहे, ते सहज आणि सोप्या पद्धतीने मनुष्याला योग्य मार्गाला लावून मुक्तीकडे जाण्यासाठी आध्यात्मिक प्रगतीचा आरंभ करविते. तुम्ही जे ‘स्वभावदोष नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक वाटते’ असे लिहीले आहेत, ते योग्यच आहे.
संग्राहक : कु. गायत्री बागल, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (८.२.२०२४)