
१. महर्षींनी सांगितल्याप्रमाणे हंपी येथील ‘नववृंदावन’ या स्थानी जाण्यासाठी होडीतून तुंगभद्रा नदी पार करून जाणे
‘२९.१.२०२१ या दिवशी आम्ही महर्षींनी सांगितल्याप्रमाणे हंपी येथे असलेल्या ‘नववृंदावन’ या नऊ सिद्धांच्या समाधीस्थानी जाण्यास निघालो. या स्थानी जाण्यासाठी तुंगभद्रा नदी पार करावी लागते आणि त्यासाठी होडीतून जावे लागते. आम्ही सर्व जण होडीतून पलीकडे गेलो. तुंगभद्रा नदीचा परिसर आणि तेथील खडक अत्यंत नयनरम्य आहेत.
२. प्रत्यक्ष प्रभु श्रीराम आणि त्याचा प्राणप्रिय भक्त हनुमान यांना पाहिलेल्या तुंगभद्रा नदीकडे पहातांना पुष्कळ भावजागृती होऊन तिला नमस्कार करणे
तुंगभद्रा नदीला पाहून माझा भाव जागृत झाला. मी तिला म्हटले, ‘अगं, तू प्रत्यक्ष श्रीरामाला पाहिले आहेस. त्याच्या परमप्रिय हनुमंताला पाहिले आहेस. तपोबलाने युक्त असणार्या अंजनीमातेला पाहिले आहेस. तुझ्या अंगाखांद्यावर प्रत्यक्ष हनुमंत खेळला आहे. अशा या जलमातेला माझा नमस्कार असो.’ मी तिचे पाणी अंगावर प्रोक्षण करून घेतले आणि तिच्या काठावर बसून तिला भावपूर्ण नमस्कार केला.
२ अ. तुंगभद्रा नदीच्या काठावर पडलेले फूल तिला अर्पण करतांना ते फूल प्रभु श्रीरामाच्या चरणी वाहून नेण्यासाठी तिला प्रार्थना करणे : तेथे नदीच्या काठावर माझ्याजवळच एक पिवळ्या शेवंतीचे फूल कोणीतरी ठेवल्यासारखे पडले होते. तेव्हा मला वाटले, ‘जणू देवाने माझ्यासाठी तुंगभद्रेच्या पाण्याच्या पूजेची सिद्धताच करून दिली.’ मी ते फूल उचलून तुंगभद्रा नदीच्या जलात सोडले आणि तिला म्हटले, ‘तू हे फूल माझ्या श्रीरामाच्या चरणी वाहून घेऊन जा.’
३. तुंगभद्रेच्या काठावर वसलेल्या आणि राजा सुग्रिवाची नगरी असलेल्या किष्किंधेचे दर्शन !
तुंगभद्रेच्या अवतीभवती सर्व किष्किंधा नगरीच आहे. किष्किंधा ही राजा सुग्रीवाची नगरी आहे. येथेच श्रीरामाने वालीचा वध केला होता. हनुमंताचा जन्मही येथेच अंजनेयाद्रीवर झाला आहे, तर शबरीचे गुरु मातंगऋषि यांचा आश्रमही येथेच आहे. किष्किंधा नगरीतील सर्वत्रचे डोंगर पाहून फारच आश्चर्य वाटते. या डोंगरावरचे सगळे दगड फुटलेल्या स्थितीत आहेत.
४. प्रभु श्रीरामाच्या समवेत स्वतःचा बलशाली पुत्र हनुमंत असतांनाही प्रभु श्रीरामाला रावणाचा वध करावा लागल्यामुळे व्यथित झालेली प्रभु श्रीरामाची परमभक्त माता अंजनी !
४ अ. माता अंजनीने प्रभु श्रीरामाला तिच्या दुधातील शक्ती दाखवण्यासाठी दुधाचा एक थेंब हवेत उडवल्यावर त्याच्या केवळ स्पर्शामुळे तेथील डोंगर फुटणे : याचे कारण विचारतांना पुढील गोष्ट कळली. ‘प्रभु श्रीराम अंजनीमातेला येथे भेटायला आले होते. तेव्हा अंजनीमाता श्रीरामरायांना विचारते, ‘हे प्रभु, माझा एवढा बलशाली पुत्र हनुमंत तुझ्या समवेत असतांना तुला रावणाला का मारावे लागले ? तुला माझ्या पुत्राच्या शक्तीवर शंका आहे का ? ज्या बाळाला मी माझे दूध पाजले, त्या दुधाच्या शक्तीवर तुला शंका आहे का ?’ असे म्हणून तिने तिच्या दुधाचा एकच थेंब हवेत उडवला. त्या दुधाच्या थेंबाच्या केवळ स्पर्शाने किष्किंधा नगरीतील सर्व डोंगर फुटले.’
४ आ. प्रभु श्रीरामाने माता अंजनीची समजूत घालतांना ‘माझ्या हातूनच रावणाचा वध व्हावा’, हे विधीलिखित होते’, असे सांगून तिला महाबली अन् परमभक्त अशा पुत्राला जन्म दिला, यासाठी नमस्कार करणे : अंजनीमाता प्रभु श्रीरामाला म्हणते, ‘हे श्रीरामा, ‘हा पुत्र जन्मावा’ यासाठी मी ७ सहस्र वर्षे तप केले. माझा पुत्र तुझी सेवा करू शकला नाही, तर त्याच्या जन्मालाच काय अर्थ राहिला ?’ तेव्हा प्रभु श्रीराम तिला सांगतात, ‘रावणाचा मृत्यू माझ्या हातून व्हावा’, हे एक विधीलिखित होते. ती एक अवताराची लीला होती. यात तुझा, तुझ्या पुत्राचा किंवा तुझ्या दुधाच्या शक्तीचा कुठलाही दोष नाही. तुझे दूध आजही तितकेच शक्तीशाली आहे. हे माते, अशा शूर, परमभक्त आणि महाप्रतापी हनुमंताला जन्म देणार्या तुला माझा नमस्कार आहे.’’
खरंच त्या वेळच्या माता तपःसामर्थ्याने केवढ्या श्रेष्ठ होत्या !नाहीतर आजकालच्या माता ! या माता आपल्या मुलांना केवळ मायेत अडकवण्यातच गुंतल्या आहेत आणि स्वतःही धर्मभ्रष्ट झाल्या आहेत. आजकालच्या सर्वच मातांनी अंजनीमातेसारखी परमेश्वराची भक्ती केली, तर त्या का नाही सुंदर भक्तांना जन्म देऊ शकणार ?
५. नववृंदावन दर्शन !
५ अ. प्रभु श्रीरामाने ‘पुढे हे स्थान सिद्धांच्या समाधीचे पवित्र स्थान बनेल’, असे सांगणे : या विचारांतच आम्ही ‘नववृंदावन’ क्षेत्रात गेलो. श्रीरामरायांनी त्रेतायुगातच या स्थानाविषयी भविष्यवाणी करून ठेवली होती. त्या वेळी या स्थानाकडे बोट दाखवून प्रभु श्रीराम लक्ष्मणाला म्हणाला, ‘‘हे लक्ष्मणा, पुढे हे स्थान सिद्धांच्या समाधीचे पवित्र स्थान बनेल’’ आणि अगदी तसेच झाले.
५ आ. विजयनगर साम्राज्याचे राजा कृष्णदेवराय यांचे राजगुरु श्री व्यासराज यांचे येथे वृंदावनाच्या रूपात समाधीस्थान असणे : ‘नववृंदावना’त त्या वेळच्या विजयनगर साम्राज्याचे राजा कृष्णदेवराय यांचे राजगुरु श्री व्यासराज यांचे समाधीस्थान वृंदावनाच्या रूपात आहे. त्यांनी १५ व्या शतकात समाधी घेतली होती. त्यांचे भारतभरात अनेक शिष्य आहेत. त्यांना मंत्रालय येथील राघवेंद्र स्वामी यांचे अवतारही समजतात. ‘त्यांनी भारतभरात एकूण ७३२ हनुमंतांच्या स्थानांची स्थापना केली’, अशी मान्यता आहे.
५ इ. ‘नववृंदावन’ येथे मध्वाचार्य संप्रदायातील अनेक विद्वान संतांच्या समाध्या असणे : ‘नववृंदावन’ हे मध्वाचार्य संप्रदायाचे सर्वांत पवित्र स्थान आहे. येथे मध्वाचार्य संप्रदायातील अनेक विद्वान संतांच्या समाध्या आहेत. येथे मध्वाचार्यांचे प्रथम शिष्य पद्मनाभ स्वामी यांचेही वृंदावन आहे. येथेच राघवेंद्र स्वामींचे गुरु श्री सुधींद्र तीर्थ यांचेही वृंदावन आहे. श्री व्यासराज तीर्थांचे वृंदावन सर्वांत मध्यभागी आहे आणि त्याच्या भोवती ‘व्यास तीर्थ, पद्मनाभ तीर्थ, कवींद्र तीर्थ, वागीशा तीर्थ, श्रीनिवास तीर्थ, राम तीर्थ, सुधींद्र तीर्थ, गोविंद ओडीयार यांचे वृंदावन’, अशी एकूण ८ वृंदावने आहेत.
६. तीन प्रतिकांचे द्योतक असलेली वैशिष्ट्यपूर्ण हनुमान मूर्ती !
येथेच श्री व्यासराज यांनी स्थापिलेली हनुमानाची प्रसिद्ध मूर्ती आहे. या मूर्तीची विधीवत् पूजा केली जाते. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे हिचा चेहरा हनुमानासारखा आहे. तिचे बाहू गदायुद्ध करणार्या भीमासारखे आहेत. या मूर्तीच्या हातात ज्ञानमय ग्रंथ आहेत. हे हनुमंताचे कलियुगातील अवतार श्री मध्वाचार्य यांचे प्रतीक आहे.
७. अनुभूती
७ अ. नवसिद्धांना प्रार्थना करतांना श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना सूक्ष्मातून नवसिद्ध स्वतः भोवती अधांतरी तरंगत असल्याचे आणि स्वतःही त्यांच्या समवेत अधांतरी तरंगत वर वर जात असल्याचे जाणवणे : या ठिकाणी आम्ही तळमळीने प्रार्थना केली, ‘हे नवसिद्धांनो, आम्हाला या ईश्वरी कार्यात, या धर्मकार्यात साहाय्य करा. आम्हाला आपले आशीर्वाद हवे आहेत. आपण आमच्या पाठीशी सदैव उभे रहा आणि आम्हा साधकांचे आपत्काळात रक्षण करा.’ अशी प्रार्थना करतांना ‘हे ९ सिद्ध संन्याशांच्या वस्त्रात एका आसनावर बसले असून ते आमच्या भोवती अंतराळी तरंगत आहेत आणि प्रसन्न मुद्रेने आम्हाला आशीर्वाद देत आहेत’, असे मला जाणवले. मी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना केली. त्या वेळी त्यांनी आमच्यावर आशीर्वादस्वरूप अक्षता, पांढरी फुले आणि तुळशीपत्रे घातली. त्या वेळी ‘मीही त्यांच्या समवेत तरंगत वर वर जात आहे’, असे मला जाणवले आणि माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. या ठिकाणी आम्ही नारळ, दक्षिणा, सनातन पंचांग अर्पण केले आणि प्रार्थना केली.
‘नववृंदावना’चे दर्शन घेऊन आम्ही आमच्या निवासस्थानाकडे होडीतून परत निघालो.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली , नंद्याळ, आंध्रप्रदेश
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |