(म्हणे) ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान तपासावे !’

राहुल गांधी यांचे पुणे न्यायालयात आवेदन

काँग्रेसचे नेते राहुल गांधी (डावीकडे)

पुणे, २० फेब्रुवारी (वार्ता.) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात पुणे  येथील विशेष न्यायालयात खटला चालू आहे. राहुल गांधी यांनी आता न्यायालयात ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान तपासावे’, अशा आशयाचे आवेदन दिले आहे. या प्रकरणी चालू असलेल्या खटल्याचे ‘समरी ट्रायल’ मधून ‘समन्स ट्रायल’मध्ये रूपांतर करावे, अशीही विनंती त्यांनी केली आहे. त्यांनी दिलेल्या आवेदनात म्हटले आहे की, ‘सावरकर यांचे खरे योगदान इतिहासातून तपासता येते. त्याची नोंद न्यायालयासमोर आणायला हवी.’ याचसमवेत राहुल गांधी यांनी स्वत: न्यायालयात उपस्थित न रहाण्याविषयीची अनुमती मागितली होती. ती न्यायालयाने मान्य केली आहे. या खटल्याची पुढील सुनावणी २५ फेब्रुवारीला होईल.

यासंदर्भात सात्यकी सावरकर यांची बाजू मांडणारे अधिवक्ता संग्राम कोल्हटकर यांनी सांगितले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न द्या किंवा अशा स्वरूपाची अन्य कोणतीही मागणी आम्ही करत नाही आहोत. स्वा. सावरकर हे एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व आहे. प्रत्येक व्यक्तीचा आत्मसन्मान हा त्याचा मूलभूत अधिकार असतो. हाच अधिकार वाचवण्यासाठी राहुल गांधी यांच्या िवरोधात तक्रार केली होती. आता ते खटल्यातून पळवाटा शोधण्यासाठी ऐतिहासिक दस्त आणि पुरावे शोधण्याची मागणी करत आहेत; कारण त्यांना हे ठाऊक आहे की, मूळ तक्रारीमध्ये त्यांना निश्चित शिक्षा होऊ शकते. न्यायालयात आमचा हाच प्रतिवाद असेल.’ खटल्याच्या तांत्रिक गोष्टींविषयी माहिती देतांना त्यांनी सांगितले की, ‘समरी ट्रायल’ खटल्याचा कालावधी अल्प असतो अन् त्याअंतर्गत देण्यात येणारी शिक्षा ३ ते ६ महिने एवढी असते. ‘समरी ट्रायल’च्या अंतर्गत खटल्याची गती अधिक असते. ‘समन्स ट्रायल’मध्ये २ वर्षांपर्यंत शिक्षा देता येऊ शकते, तसेच खटल्याचा कालावधी अधिक असू शकतो.

या संदर्भात तक्रारदार सात्यकी सावरकर यांनी सांगितले की, आम्ही आता पूर्ण सिद्धता केली आहे. हा खटला पूर्ण शक्तीनिशी लढू.’

पुणे न्यायालयात उपस्थित न रहाण्याविषयी राहुल गांधी यांच्या वतीने त्यांच्या अधिवक्त्यांनी दिलेली कारणे

१. पुणे न्यायालय ही ऐतिहासिक वास्तू आहे, तसेच काही वर्षांपूर्वी ‘या परिसरात बाँबस्फोट करू’, अशा धमक्याही देण्यात आल्या होत्या. त्यामुळे पुणे न्यायालय हे अतिशय असुरक्षित आणि धोकादायक जागा आहे.

२. वि.दा. सावरकर यांच्यावर गांधीहत्येच्या षंड्यंत्रात सहभागी असल्याचे आरोप होते.  तक्रारदार सात्यकी सावरकर हे वि.दा. सावरकर यांचे नातू असल्याचे सांगतात.

३. गांधीहत्येचे आरोपी नथुराम गोडसे हे पुण्यातील होते.

४. पूर्वी न्यायालयाच्या आवारात हत्या झाल्याचेही निदर्शनास आले आहे.