साधना करतांना येत असलेल्या विविध अडचणींच्या निवारणासाठी संतांनी सांगितलेले नामजपादी उपाय करण्यासह कुलदेवतेला भावपूर्ण प्रार्थना करण्याचे महत्त्व !

१. जिवाच्या सर्वांगीण उन्नतीचे दायित्व कुलदेवतेकडे असल्याने साधकांनी संत आणि उत्तरदायी साधक यांनी सांगितलेले उपाय करण्यासह कुलदेवतेलाही प्रार्थना करणे आवश्यक

श्री. निषाद देशमुख

‘सध्या काळाची प्रतिकूलता असल्याने साधकांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक या तिन्ही स्तरांवर त्रास होत आहेत. हे त्रास दूर होण्यासाठी साधकांनी वेळोवेळी मार्गदर्शक संत आणि उत्तरदायी साधक यांना विचारून नामजपादी उपाय करणे आवश्यक आहे, तसेच साधनेत येणारे विविध अडथळे दूर करण्यासाठी कुलदेव आणि कुलदेवी यांनाही प्रार्थना करणे आवश्यक आहे. जिवाच्या सर्वांगीण उन्नतीचे दायित्व कुलदेवतेकडे असते. त्यामुळे साधनेतील विविध अडथळे अल्प होण्यासाठी कुलदेवतेचे साहाय्य घेणेही आवश्यक आहे.

२. साधकांचे कुलदैवत गुरुच असणे आणि कुलदेवतेला प्रार्थना केल्याने गुरूंच्या निर्गुण तत्त्वप्रधान संकल्पाला कुलदेवतारूपी सगुण शक्तीची जोड मिळाल्याने साधकांच्या साधनेतील अडचणी सुटण्यासाठी साहाय्य होत असणे

येथे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, ‘साधक गुरुकृपायोगानुसार साधना करत असल्याने ते मुळात गुरुकुलाचे झाले आहेत, म्हणजे त्यांचे कुलदैवत हे गुरुच असतात. शिष्याच्या सर्व अडचणी सोडवणारे दैवत गुरुच आहेत. असे असले, तरीही ज्याप्रमाणे व्यवहारात एका कामासाठी त्या खात्याच्या मंत्र्याने अनुमती दिली, तरीही त्याच्या आदेशाची कार्यवाही विशिष्ट कार्यालयाच्या अनेक कर्मचार्‍यांच्या द्वारे होते, त्या कार्यालयाच्या कार्यपद्धती आणि नियम पाळून कार्य करावे लागते. त्या खात्यातील कर्मचारी आपला ओळखीचा असेल, तर त्याच्या साहाय्याने आपल्याला ते कार्य सहजतेने करणे शक्य होते.

त्याचप्रमाणे साधक आणि शिष्य यांच्या साधनेतील अडचणी सोडवण्यासाठी गुरूंचा संकल्प कार्यरत असतोच; पण मार्गदर्शक संत आणि उत्तरदायी साधक यांनी सांगितलेले उपाय करण्यासह साधकांनी अडचण सोडवण्यासाठी कुलदेवतेलाही प्रार्थना केल्यास कुलदेवता साधकाच्या कुळातील पातक (पाप), प्रारब्ध, कुळात अडकलेले पूर्वज अशा विविध कारणांमुळे उद्भवलेल्या अडचणी अल्प काळात सुटण्यासाठी साहाय्य करते. याचे कारण म्हणजे गुरूंच्या निर्गुण तत्त्वप्रधान संकल्पाला कुलदेवतारूपी सगुण शक्तीची जोड मिळते.’

२ अ. साधकांनी कुलदेवतेचे केवळ भावपूर्ण स्मरण आणि प्रार्थना केल्याने त्यांना लाभ होणार असणे : साधकांनी हेही लक्षात घ्यायला हवे की, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी, म्हणजे गुरूंनी साधकांच्या कुलदेवतांना प्रथम प्रसन्न करून घेतले आहे. यामुळे साधकांनी कुलदेवतेचे केवळ भावपूर्ण स्मरण आणि प्रार्थना केल्याने साधकांच्या कुलदेवता धावून येऊन साधकांना साहाय्य करणार आहेत.

२ आ. साधकांनी साधनेत अडचणी आलेल्या विविध प्रसंगांत गुरु आणि उपास्यदेवता यांसह कुलदेवतेलाही त्या अडचणी सुटण्यासाठी भावपूर्ण प्रार्थना करावी.’

– श्री. निषाद देशमुख (स्वप्नात मिळालेले ज्ञान)(आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), फोंडा, गोवा.  (१३.१.२०२५)