
अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी २ महिन्यांपूर्वी ‘मुक्काम पोस्ट मनोरंजन’ या यू ट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीतील त्यांच्या वक्तव्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे. समाजमाध्यमांतून या संदर्भात प्रखर टीका होत झाली. इतिहासकार इंद्रजित सावंत, भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी ‘सोलापूरकर यांनी क्षमा मागितली पाहिजे. त्यांची जीभ हासडायला हवी’, असे म्हटले आहे. अलीकडे देवी, देवता, हिंदूंच्या परंपरा, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांसारख्या पूजनीय व्यक्तीमत्त्वांंवर वादग्रस्त टिपणी करायची आणि प्रकाशझोतात यायचे, ही एक नवरूढी झाली आहे. कुणीतरी अवमानात्मक टीकाटीपणी, मतप्रदर्शन करतो, त्यानंतर तथाकथित भक्तांना, अनुयायांना पोटशूळ उठल्याने त्या वक्तव्याचा निषेध सामाजिक माध्यमांवर जोरदारपणे केला जातो. अंतिमत: क्षमा मागणे यांसारख्या तात्कालिक शिक्षा सुनावल्या जातात. आता हे नित्याचे झाले आहे. काही काळ ते प्रकरण माध्यमांत चघळले जाते. त्यानंतर अवमान करणारा आणि त्याला विरोध करणारा सगळेच शांत होतात.
छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचा, तसेच हिंदुत्वाचा जाज्वल्य इतिहास आहेत. ज्या काळात यवन आक्रमणकर्त्यांच्या अन्याय-अत्याचारांखाली जनता पिचलेली होती. त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी निधड्या छातीने आक्रमणकर्त्यांना आव्हान दिले. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण आज हिंदु म्हणून जीवन जगू शकत आहोत, त्यांच्याविषयी कुठल्या प्रकारची आणि दर्जाची भाषा वापरावी ? याचे भान वक्त्यांना रहात नसेल, तर आपण इतिहासाकडून काय शिकलो ?, असा प्रश्न निश्चितच उत्पन्न होईल. इतिहास हा शिकण्यासाठी आणि त्याला अनुसरून वर्तमानात जगण्यासाठी तो शिकवला जातो. आपण आपल्या इतिहासाची कदर केली नाही, तर भारतीय संस्कृती नष्ट होण्यास फारसा काळ जावा लागणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘धटासी आणावा धट । उत्धटासी पाहिजे उत्धट ।…’ या समर्थ रामदासस्वामी यांच्या श्लोकानुसार ‘गनिमीकावा’ या युद्धतंत्राचा वापर करत यवनांना धडा शिकवला. म्हणतात ना ‘सिधी उंगलीसें घी ना निकलें तो उंगली तेढी करनी चाहिये ।’ (कुणी सरळ ऐकले नाही, तर त्याला ऐकायला भाग पाडावे लागते.) तसेच ते होते. छत्रपती शिवरायांच्या उत्तुंग कार्याची अंतर्मनात जाण नसल्यामुळे त्यांच्याप्रती असे अवमानात्मक वक्तव्य केले जाते. त्यावर समाजातून उमटणार्या प्रतिक्रियाही वरवरच्या असतात. ज्या छत्रपतींनी हिंदूंच्या अस्तित्वासाठी संपूर्ण जीवन वेचले त्यांचा आदर्श आपण किती अंगीकारतो, याचे आत्मचिंतन समस्त शिवभक्तांनी करायला हवे.
– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.