Trump Calls Zelenskyy A ‘Dictator’ : झेलेंस्की किरकोळ विनोदी अभिनेते असणारे हुकूमशहा ! – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांवर टीका

वॉशिंग्टन (अमेरिका) कीव (युक्रेन) – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांच्या विरोधात ‘एक्स’वर पोस्ट करत त्यांना ‘किरकोळ विनोदी कलाकार आणि निवडून न आलेला हुकूमशहा’, असे म्हटल्याने वाद निर्माण झाला आहे. त्यापूर्वी ट्रम्प यांनी सांगितले होते की, युक्रेनमध्ये झेलेंस्की यांची लोकप्रियता केवळ ४ टक्केच राहिली आहे. त्यावर झेलेंस्की म्हणाले होते की, ट्रम्प चुकीच्या माहितीसह वावरत आहेत. त्यावर उत्तर देतांना ट्रम्प यांनी वरील पोस्ट केली.  युक्रेनमधील राष्ट्रपतींचा कार्यकाळ गेल्या वर्षी मे महिन्यात संपला. तथापि फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाच्या आक्रमणापासून युक्रेन सैनिकी राजवटीखाली आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

१. ट्रम्प यांनी पोस्टमध्ये पुढे लिहिले की, मला युक्रेन आवडते; पण झेलेंस्की यांनी खूप वाईट काम केले आहे. त्यांचा देश उद्ध्वस्त झाला आहे आणि लाखो लोक अनावश्यक मरण पावले आहेत.

२. ‘शांतता प्रस्थापित करण्यासाठी झटपट हालचाली करा, अन्यथा तुम्ही तुमचा देश गमावून बसाल’, अशी चेतावणी ट्रम्प यांनी एक दिवसाआधी झेलेंस्की यांना दिली होती.

३. रशियाला युक्रेनमधील संघर्ष थांबवायची इच्छा असल्याचे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले होते.

युरोपीय देशांकडून झेलेंस्की यांचे समर्थन

१. युरोपीय नेते झेलेंस्की यांचे समर्थन करत आहेत. जर्मन व्हाईस चान्सलर ओलाफ स्कोल्झ म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांची लोकशाही वैधता नाकारणे पूर्णपणे चुकीचे आणि धोकादायक आहे.

२. ब्रिटीश पंतप्रधान केयर स्टार्मर म्हणाले की, युद्धाच्या काळात निवडणुका पुढे ढकलणे पूर्णपणे योग्य होते.

३. स्विडनचे पंतप्रधान उल्फ क्रिस्टरसन यांनीही ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे.

४. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो म्हणाले की, युक्रेन जगभरात स्वतःला सुरक्षित ठेवणार्‍या नियम-आधारित व्यवस्थेसाठी लढत आहे.