चिंचबांध येथील सूर्यमंदिरात उरूस साजरा  करण्यास अनुमती दिली, तर हिंदू महाआरती करतील !

सनातन हिंदु बांधवांचे पोलिसांना निवेदन

उरूस करण्यास अनुमती दिली, तर महाआरती (प्रतिकात्मक चित्र)

राजापूर – शहरातील पुरातन असणार्‍या चिंचबांध येथील सूर्यमंदिरात, जर अनधिकृतरित्या अचानक उरूस करण्यास अनुमती दिली, तर आम्ही त्या ठिकाणी महाआरतीचे आयोजन करू, अशी चेतावणी राजापूर शहरातील समस्त सनातन हिंदु बांधवांनी दिली आहे. या उरुसाला अनुमती देऊ नये, तसेच येथे उरूस साजरा करण्यात येऊ नये, यासाठी हिंदु बांधवांनी राजापूर पोलिसांना निवेदन दिले.

या निवेदनात म्हटले आहे की …

हे सूर्यमंदिर हिंदु बांधवांचे श्रद्धास्थान आहे. या मंदिराचा उल्लेख वर्ष १७१७ मधील बखरीमध्ये आढळतो. या मंदिराचा उल्लेख वर्ष २०१५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘राजापूरचा इतिहास’ या पुस्तकातही आहे. हे पुस्तक इतिहासकार आणि स्वातंत्र्यसैनिक प्रभाकर द. मराठे यांनी लिहिलेले आहे. हे मंदिर प्राचिन असून मंदिराचा ढाचा आणि अन्य शिल्पे पाहिल्यास हे हिंदु मंदिर असल्याचे स्पष्ट होत आहे. या मंदिराविषयी अन्य इतिहास असून त्याविषयी योग्य त्या कागदपत्रांसहित पुरावे सादर करण्याची आमची सिद्धता आहे. या मंदिरावर मुसलमान समाजाचा कोणताही हक्कसंबंध नव्हता आणि नाही.

सूर्यमंदिर असलेल्या भूमीच्या महसूल दफ्तरी असलेल्या नोंदींमध्ये खोडसाळपणा केल्याचे दिसून येते. असे असले, तरी हे सूर्यमंदीर पुरातन असून ते राष्ट्राची संपत्ती आहे. त्यामुळे त्याच्याविषयीच्या कागदपत्रांमध्ये खोडसाळपणा करून त्याचे अस्तित्व नष्ट करता येणार नाही. या मंदिरात यापूर्वी कधीही कोणत्याही स्वरूपाचे उत्सव मुसलमान समाजाकडून करण्यात आलेले नव्हते. तरीही येथे उरूस साजरा करण्यासाठी अनुमती मिळावी, यासाठी अर्ज करण्यात आल्याचे समजते.

त्यामुळे येथे उरुस साजरा करण्यास आमचा सक्त विरोध, असे निवेदनात म्हटले आहे. या मंदिराचे पावित्र्य नष्ट करून अन्य कोणत्याही धर्मांनी कोणत्याही स्वरुपाचे उत्सव केल्यास सामाजिक शांतता भंग पावणारी आहे. त्यामुळे येथे उरुस साजरा करण्यास आमचा सक्त विरोध, असे निवेदनात म्हटले आहे.

चिंचबांध येथे उरुस साजरा करण्यास पोलिसांनी अनुमती नाकारली !

राजापूर – रत्नागिरी जिल्ह्यात मनाई आदेश लागू असल्याने राजापूर शहरातील चिंचबांध येथे जमाव करून उरूस साजरा करता येणार नाही, असे स्पष्ट करत पोलिसांनी येथे उरूस साजरा करण्यासाठी मागण्यात आलेली अनुमती नाकारली असल्याची माहिती राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजाराम चव्हाण यांनी दिली आहे. राजापूर शहरातील चिंचबांध येथे उरूस साजरा करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडे अनुमतीचा अर्ज सादर करण्यात आला होता.