नवी देहली – यंदाचे ९८ वे ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन’ देहली येथील तालकटोरा स्टेडिअममध्ये उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत होणार आहे. २१ ते २३ फेब्रुवारीपर्यंत कवी संमेलन, मुलाखत, परिसंवाद असे वेगवेगळे एकापेक्षा एक भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे आयोजक असणार्या ‘सरहद’ संस्थेचे प्रमुख संजय नहार यांनी महाराष्ट्र सदन येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

संजय नहार म्हणाले, ‘‘याचे उद़्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. दुपारी साडेतीनला विज्ञान भवनात आयोजित उद्घाटनाच्या मुख्य सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. राज्यातील साहित्यिक मोठ्या संख्येने या साहित्य सोहळ्यास उपस्थित रहाणार आहेत. तत्पूर्वी सकाळी ग्रंथदिंडी काढण्यात येणार असून ध्वजारोहण होणार आहे.’’
सभामंडपांची नावे
छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण अशा महापुरुषांच्या नावे सभामंडप असून प्रवेशद्वाराला अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्यात आले आहे.
विविध परिसंवाद
२२ फेब्रुवारीला ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या विषयावर मान्यवरांची मुलाखत, विशेष सत्कार सत्र, ‘लोकसाहित्य भूपाळी ते भैरवी’, ‘राजकारणाचे मराठी साहित्यात उमटणारे प्रतिबिंब’ आणि सायंकाळी ‘मधुरव’ हा सांस्कृतिक कार्यक्रम असणार आहे. याच दिवशी यशवंतराव चव्हाण सभामंडप येथे ‘बहुभाषिक कवी संमेलन’, बृहन्महाराष्ट्रातील मराठी माणसांचे जीवन आणि साहित्य’, ‘मराठी भाषा आणि महाराष्ट्र धर्म’ अशा विषयावर परिसंवाद आहेत. २३ फेब्रुवारीला ‘असे घडलो आम्ही’ या विषयांवर मुलाखत, ‘सामाजिक कार्य आणि मराठी साहित्य, ‘नाते देहलीशी मराठीचे’, ‘कृत्रिम बुद्धीमत्ता आणि सृजनशीलता’ या विषयांवर परिसंवाद आहेत.
साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे
या संमेलनासाठी १९ फेब्रुवारीला पुणे येथून विशेष रेल्वे देहलीला जाणार असून या रेल्वेमध्येसुद्धा साहित्य संमेलन होणार आहे. या विशेष रेल्वेला ‘महादजी शिंदे एक्सप्रेस’, असे नाव देण्यात आले आहे. प्रत्येक रेल्वे डब्याला गड-दुर्गांची नावे देण्यात आलेली आहेत. या रेल्वेमध्ये होणार्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी मराठी भाषा मंत्री उदय सामंत असणार आहेत.