Pakistan Is Global Epicentre Of Terrorism : पाक स्वतः आतंकवाद्यांना पोसतो आणि वर स्वतःला ‘आतंकवादाविरुद्ध लढणारा देश’ म्हणवतो, हा मोठा विनोद ! – भारताचे स्थायी प्रतिनिधी परवाथनेनी हरीश

भारताने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पुन्हा फटकारले !

भारताचे स्थायी प्रतिनिधी (राजदूत) परवाथनेनी हरीश

न्यूयॉर्क (अमेरिका) – संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेल्या २० हून अधिक आतंकवादी संघटना पाकिस्तानमध्ये आहेत. असे असूनही जेव्हा पाकिस्तान स्वतःला ‘आतंकवादाविरुद्ध लढणारा देश’ म्हणतो, तेव्हा तो सर्वांत मोठा विनोद असतो. भारत स्वतः पाकपुरस्कृत आतंकवादाचा बळी ठरला आहे. पाकिस्तानी भूमीवरून कार्यरत असलेल्या ‘जैश-ए-महंमद’सारख्या आतंकवादी संघटनांनी भारतात अनेक आतंकवादी आक्रमणे केली आहेत, अशा शब्दांत भारताने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत फटकारले. भारताचे स्थायी प्रतिनिधी (राजदूत) परवाथनेनी हरीश यांनी ‘आतंकवादाचे जागतिक केंद्र’ म्हणून पाकिस्तानचे वर्णन केले. पाकिस्तानचे उपपंतप्रधान असणारे परराष्ट्रमंत्री महंमद इशाक दार यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत जम्मू-काश्मीरचे सूत्र उपस्थित केल्यावर भारताने त्याला प्रत्युत्तर दिले.

भारताचे राजदूत पी. हरीश म्हणाले की,

१. आतंकवादाचे कोणतेही कारण किंवा हेतू स्वीकारता येणार नाही. निष्पाप लोकांवर होणारी आक्रमणे कोणत्याही प्रकारे समर्थनीय ठरू शकत नाहीत. पाकिस्तान खोटेपणा आणि चुकीची माहिती पसरवण्याचा प्रयत्न करतो; परंतु यामुळे सत्य पालटत नाही.

२. जैश-ए-महंमद आणि हिजबुल मुजाहिदीन यांसारख्या आतंकवादी संघटनांनी भारतात अनेक आक्रमणे केली आहेत. पाकिस्तान त्यांना सीमेपलीकडून पाठिंबा देतो, ज्यामुळे भारतात हिंसाचार पसरतो.

३. पाकिस्तानमधील अनेक आतंकवादी संघटना आणि व्यक्ती संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रतिबंध समितीच्या सूचीत आहेत, ज्यामध्ये मालमत्ता गोठवणे, शस्त्रास्त्र पुरवठा बंदी आणि प्रवास बंदी लागू आहे.

४. जम्मू-काश्मीरमध्ये लोकशाही भक्कम आणि चैतन्यशील आहे, तर पाकिस्तानमध्ये तसे नाही. प्रत्यक्षात पाकिस्तान स्वतः जम्मू-काश्मीरच्या काही भागांवर बेकायदेशीरपणे नियंत्रण ठेवत आहे आणि तेथील परिस्थिती वाईट आहे.

संपादकीय भूमिका

भारताने पाकला शब्दांद्वारे कितीही वेळा फटकारले, तरी त्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच रहाणार आहे. त्याला शब्दांची नाही, तर शस्त्रांचीच भाषा समजते आणि ती सांगण्याचे धाडस भारत दाखवत नाही, हे भारतियांचे दुर्दैव !