भारतीय परंपरेचा आदर्श !

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन्

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् या नेहमी भारतीय पारंपरिक पेहरावात, म्‍हणजे साडीत असतात. यंदाच्‍या वर्षीचा अर्थसंकल्‍प सादर करतांना नेसलेली फार पूर्वीपासून  चालत आलेल्‍या ‘मधुबनी’ या कलेपासून निर्माण केलेल्‍या साडीने अनेकांचे लक्ष वेधल्‍याचे दिसून आले.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी नसलेली ही साडी मधुबनी चित्रे साकारणार्‍या पद्मश्री पुरस्‍कारप्राप्‍त दुलारी देवी यांनी त्‍यांना भेट म्‍हणून दिली होती. बिहारमधील ‘मधुबनी’ ही एक लोककला असून तिचा जन्‍म दरभंगा जिल्‍ह्यातील मधुबनी या खेड्यात झाला. झोपड्यांच्‍या भिंतींवर, भूमी आणि देवघर सुशोभित करण्‍यासाठी येथील आदिवासी स्‍त्रिया रंगीत चित्रे काढत. तीच चित्रे ‘मधुबनी चित्रकला’ म्‍हणून प्रसिद्ध झाली. या चित्रकलेमध्‍ये प्रामुख्‍याने रामायण, महाभारत, अन्‍य पुराणकथा यांमधील वेगवेगळे प्रसंग, तसेच देवता आणि शुभसूचक चिन्‍हे यांचा समावेश असतो. ही कला वंशपरंपरेने आजही टिकून आहे. ही मधुबनी कला हळूहळू काळानुसार भिंतीवरून कपडे आणि कागद यांवर उमटू लागली.

मधुबनी चित्रे ‘द्विमिती’त असतात. या चित्रांची आकाराची बाह्यरेषा दुहेरी असते. या दोन रेषा म्‍हणजे ‘सत्‍य’ आणि ‘शिव’ असून या दोघांनी मिळून सृष्‍टीची रचना होते, असे मधुबनी चित्रकार मानतात. स्‍त्रियांनी परंपरेने जपलेली कलापंरपरेतील सर्वाधिक चित्रे ही रामायणावर आधारित आहेत. मुख्‍य म्‍हणजे ‘सीता स्‍वयंवर’ हा त्‍यांचा आवडता विषय असल्‍याचे दिसून येते. त्‍यामुळे मधुबनी चित्रकला केवळ एक लोककला नसून ती संपूर्ण जगात भारताच्‍या समृद्ध सांस्‍कृतिक वारशाचे प्रतीक ठरली आहे.

सुधा मूर्ती

भारतातील दुसरे एक आदर्श आणि यशस्वी स्त्‍रीचे उदाहरण म्हणजे सुधा मूर्ती. या ‘इन्फोसिस’चे संंस्थापक नारायण मूर्ती यांच्या पत्नी आहेत. नामांकित लेखिका, व्यावसायिक महिला आणि सामाजिक कार्यकर्त्या अशी ओळख असलेल्या सुधा मूर्ती या कुठल्याही कार्यक्रमाला गेल्या, तर तेथील ज्येष्ठांना नेहमी वाकून नमस्कार करतात. सुधा मूर्ती यांनी अनेक अनाथाश्रमांची स्थापना केली आहे. ग्रामीण विकासाच्या प्रयत्नांमध्ये भाग घेतला आहे. कर्नाटकातील सर्व सरकारी शाळांना संगणक आणि ग्रंथालय सुविधा उपलब्ध करून देण्याच्‍या चळवळीला पाठिंबा दिला. हॉवर्ड विद्यापिठात ‘द मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया’ची त्यांनी स्थापना केली आहे.

भारतीय संस्‍कृती आणि परंपरा जपणार्‍या उच्‍च पदावरील महिलांचा आदर्श युवा पिढीने घ्यायला हवा. निर्मल सीतारामन् किंवा सुधा मूर्ती या अतिशय बुद्धीमान आणि देशासाठी मोठे कार्य करणार्‍या स्त्रियाही भारतीय संस्कृती अन् परंपरा जपण्यावर भर देतात, यावरून भारतीय संस्कृती आणि परंपरा यांचे मोठेपणही लक्षात येते !

– श्री. अमोल चोथे, पुणे