वर्ष १९९४ पासून सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करणार्या आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर नितांत श्रद्धा असणार्या एका साधकाचे एप्रिल २०२२ मध्ये निधन झाले. त्यांच्या संपर्कात असणार्या काही साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

१. श्री. प्रकाश राऊत, फोंडा, गोवा.

१ अ. साधकांना बोलण्यासाठी प्रवृत्त करणे : ‘मी डोंबिवली येथे नवीनच रहायला आलो होतो. एका साधकाचे एका गणेश मंडळात प्रवचन होतेे; म्हणून मी तिथे गेलो होतो. त्या वेळी त्या साधकाने मला अकस्मात् प्रवचनापूर्वी जिज्ञासूंना संस्थेची माहिती आणि प्रस्तावना सांगायला सांगितली. त्या वेळी मी संस्थेत नवीन होतो. यातून मला त्यांचा नेतृत्व गुण लक्षात आला.
१ आ. साधकांचे कौतुक करणे : एकदा परम पूज्य गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) जाहीर सभेसाठी कापडी फलक (‘बॅनर’) लावत असतांना मी एक कापडी फलक वर चढून लावला. तो व्यवस्थित आणि सरळ लागला होता. ते पाहून त्या साधकाने ‘कापडी फलक व्यवस्थित लावायलाही साधना लागते’, असे म्हणून माझे कौतुक केले होते.
१ इ. ते साधक कुठेही भेटले, तरी थांबून परम पूज्यांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांची) आणि सर्व साधकांची चौकशी करायचे.’ (१२.५.२०२२)
२. श्री. नंदकुमार कैमल, केरळ

२ अ. पूर्णवेळ साधना करण्यासाठी प्रोत्साहन देणे : ‘वर्ष १९९९ मध्ये केवळ काही साधकच मुंबई सेवाकेंद्रात पूर्णवेळ साधना करत होते. ‘त्या वेळी पूर्णवेळ साधना करणे’, हे सर्व साधकांच्या कल्पनेच्या पलीकडचे होते; परंतु त्या वेळी एका साधकाने मला माझ्या घरातून पुष्कळ विरोध असतांनासुद्धा पूर्णवेळ साधना करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
२ आ. सेवेची तळमळ : ते साधक ‘परात्पर गुरु डॉ. आठवले प्रत्येक गोष्ट जशी सांगत, तशी तंतोतंत कृतीत कशी आणायची ? त्यामागील भाव कसा असायला पाहिजे आणि अध्यात्मशास्त्रीय दृष्टीकोन काय आहे ?’, हे सर्व विस्तृतपणे अन् आम्हाला समजेल’, असे सांगायचे. रात्रीचे साडेबारा किंवा कधी १ वाजला, तरी ते उत्साहाने आमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे द्यायचे.’ (१८.५.२०२२)
३. अधिवक्ता रामदास केसरकर (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६९ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

३ अ. डोंबिवली येथे परात्पर गुरु डॉ. आठवले घेत असलेल्या प्रथम अभ्यासवर्गापासूनच सनातन संस्थेशी जोडले जाणे आणि त्यांनी सेवाही चालू करणे : ‘वर्ष १९९४ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी नौपाडा, ठाणे येथील ‘न्यू इंग्लिश स्कूल’मध्ये घेतलेले पहिले दोन अध्यात्मशास्त्राचे अभ्यासवर्ग झाल्यानंतर डोंबिवली येथे त्यांनी घेतलेल्या पहिल्या अध्यात्मशास्त्राच्या अभ्यासवर्गात ते साधक उपस्थित होते. डोंबिवली येथील गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) प्रथम अभ्यासवर्गापासूनच ते सनातन संस्थेशी जोडले गेले आणि त्यांनी सेवाही चालू केली.
३ आ. सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात येणारा प्रत्येक अभ्यासवर्ग आणि परात्पर गुरु डॉ. आठवले घेत असलेल्या साप्ताहिक सत्संगाला नियमित उपस्थित रहाणे अन् अधिवक्ता रामदास केसरकर यांच्या समवेत सेवेला जाणे : त्यानंतर ते सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात येणारा प्रत्येक अभ्यासवर्ग आणि परात्पर गुरु डॉ. आठवले प्रत्येक बुधवारी मुंबई सेवाकेंद्रात घेत असलेल्या साप्ताहिक सत्संगाला नियमित उपस्थित रहात असत. कल्याण येथील अभ्यासवर्गाचे कापडी फलक (बॅनर्स) बांधण्याच्या सेवेसाठी आम्ही दोघे समवेत जायचो. त्यानंतर जळगाव येथील अध्यात्मप्रसाराच्या सेवेसाठी आम्ही द़ोघे समवेत शनिवार आणि रविवारी नियमित जात होतो.
३ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अभ्यासवर्गात साधना समजल्यावर सांप्रदायिक साधनेच्या मर्यादा लक्षात येणे आणि गुरुकृपायोगानुसार साधनेला प्रारंभ करणे : हे साधक आधीपासून सांप्रदायिक साधना करत होते. त्यांचा अध्यात्मशास्त्राचा अभ्यासही चांगला होता; परंतु गुरुदेवांच्या (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या) अभ्यासवर्गात त्यांना सांप्रदायिक साधनेच्या मर्यादा लक्षात येताच त्यांनी आपल्या साधनेत पालट करून परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या गुरुकृपायोगानुसार साधना चालू केली. त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर नितांत श्रद्धा होती.’ (१६.५.२०२२)