कलियुगाचा प्रभाव दिवसेंदिवस वाढल्याने कुटुंबात अंतर्गत कलह वादविवाद पराकोटीला पोचल्याचे दृश्य सध्या सर्वत्र दिसत आहे. मनुष्यप्राणी प्रेम, आपुलकी, जवळीक, परस्परांशी असलेले नाते सर्व विसरून अतिशय संकुचित झाला आहे. याचे एक उदाहरण अलीकडेच वाचायला मिळाले. मध्यप्रदेशातील टीकमगडमध्ये ‘वडिलांवर अत्यसंस्कार कोण करणार ?’ यावरून २ मुलांमध्ये भांडण झाले. धाकट्याने वडिलांची सेवा केल्यामुळे त्याला वडिलांवर अंत्यसंस्कार करायचे होते, तर मोठा मुलगा असल्याने वडिलांवर अंतिमसंस्कार करण्याचा अधिकार त्याचाच असल्याचा दावा त्याने केला. अंत्यसंस्काराची संपूर्ण सिद्धता झाली, तरी चितेला अग्नि कुणी द्यायचा ? हे ठरेना. ग्रामस्थ आणि नातेवाईक, तसेच मृतदेह तब्बल ५ घंटे ताटकळत होता. अमानुषतेचा कळस म्हणजे थोरल्या मुलाने मृतदेहाचे दोन तुकडे करून प्रत्येक तुकड्यावर स्वतंत्रपणे अत्यंसंस्कार करण्याचे सुचवले. पोलिसांना माहिती देताच पोलीस घटनास्थळी पोचले आणि दोन्हीं मुलांची समजूत काढल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन्ही मुलांपैकी एकही जण त्याचा दावा सोडायला सिद्ध नव्हता. जिवंतपणे माता-पित्यांचा सांभाळ कुणी करायचा यावरून हल्ली पुष्कळ भांडणे होतात. आता मरणोपरान्त अंतिम संस्कार करण्यासाठीही वादावादी आणि मृतदेहाचे तुकडे करण्याची भाषा म्हणजे असंवेदनशीलतेची परिसीमा झाली. मनुष्यप्राण्याला भगवंताने सारासार विचार करण्याची ‘विवेकबुद्धी’ दिली आहे; पण मनुष्य विवेक विसरून अविवेकी वागायला लागल्यास त्याला जनावर का म्हटले जाऊ नये ?, असा प्रश्न पडतो.
चंद्रपूरमधील वरोरा तालुक्यातील पिंपळगाव मारुति येथील अनुसयाबाई या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. तिच्या अंत्ययात्रेला एक वानर उपस्थित होते. अनुसयाबाई यांचे पार्थिव स्मशानभूमीत नेत असतांना साक्षात श्री मारुतीचे रूप समजले जाणारे एक वानर त्यांच्या घरी आले आणि अनुसयाबाईंच्या पार्थिवाचे दर्शन घेत त्यांना नमस्कार केला. अंत्यसंस्कार होईपर्यंत वानर स्मशानभूमीत होतेे, त्यानंतर घरापर्यंत आले. नातेवाईक जेव्हा अनुसयाबाईंच्या अस्थी घेण्यासाठी स्मशानभूमीत गेले, तेव्हा आणि तेथून अस्थी घेऊन घरी आले, तेव्हाही अनुसयाबाईंच्या घरापर्यंत ते आले आणि नंतर गेले. यातून वानराने त्याच्यातील ‘संवेदनशीलते’चा परिचय दिला. अंत्ययात्रेच्या वेळी परिस्थिती हाताळण्यासाठी लागणारे संवेदनशील हृदय, सतर्कता यांचा उत्तम मिलाप एका वानरामध्ये बघायला मिळावा; मात्र जन्माने मनुष्याच्या अपत्यांमध्ये पित्याप्रती संवेदनशीलतेचा प्रचंड अभाव हा केवळ ‘दैवर्दुविलास’ नव्हे का ?
– धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.