रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात साधना करणार्या सौ. उर्मिला रामेश्वर भुकन आणि सौ. रोहिणी वाल्मिक भुकन (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांनी त्यांच्या आजेसासूबाई पू. (कै.) श्रीमती शेऊबाई लोखंडेआजी यांची भावपूर्ण सेवा केली. याविषयी श्री. वाल्मिक भुकन यांना लक्षात आलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे येथे दिली आहेत.

१. लग्न होऊन घरी आल्यापासून पू. लोखंडेआजींच्या दोघी नातसुनांनी पू. आजींची सेवा करणे
‘माझी वहिनी सौ. उर्मिला रामेश्वर भुकन आणि माझी पत्नी सौ. रोहिणी वाल्मिक भुकन (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांनी त्यांच्या आजेसासूबाई पू. (कै.) श्रीमती शेऊबाई लोखंडेआजींची (सनातनच्या ६४ व्या संत) सेवा त्या संत होण्याच्या आधीपासून केली आहे. सौ. उर्मिला आमच्या घरी लग्न होऊन आल्यापासून त्यांनी पू. आजींची सेवा केली आहे.

२. नाते न पहाता संत असल्याचा आदर करत पू. आजींची सेवा करणे
सध्याच्या काळात समाजातील लोकांची घरातील वयस्कर व्यक्तीला सांभाळण्याची सिद्धता नसते. काही जण स्वतःच्या आई-वडिलांनाही सांभाळत नाहीत. पू. आजी नात्याने या दोघींच्या आजेसासूबाई (सासूबाईंच्या आई) होत्या; मात्र या दोघींनी नाते कधीच पाहिले नाही. पू. आजी संत असल्याचा आदर करत त्यांनी पू. आजींची सेवा केली.
३. रामनाथी आश्रमात सेवा करून पू. लोखंडेआजींच्या शेवटच्या दिवसांत त्यांची सर्व सेवा भावपूर्ण करणे
वर्ष २०२० मध्ये पू. आजींना अर्धांगवायूचा झटका आला. पू. आजींना त्यांच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये स्वतःचे काही करायला जमायचे नाही. त्यामुळे सकाळी पू. आजींचे सर्व आवरून रामनाथी आश्रमात सेवेला जाणे आणि रात्री घरी आल्यावर माझ्या आईला (सासूबाईंना, श्रीमती इंदुबाई भुकन, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ६० वर्षे यांना) काही साहाय्य लागल्यास ते करणे, अशा सेवा त्या द़ोघींनी कुठलेही गार्हाणे न करता केल्या. पू. आजी त्यांना सांगत, ‘‘तुम्हाला माझी पुष्कळ सेवा करावी लागते ना ? तुम्हाला दमायला होत असेल ना ?’’ त्या द़ोघी जणी ‘प.पू. गुरुदेवांनी आम्हाला संतसेवा करण्याचे भाग्य द़िले आहे. असे भाग्य सर्वांना मिळते असे नाही. या सेवेतून प.पू. गुरुदेव आणि पू. आजी आमची साधना करून घेत आहेत’, या भावाने दोघींनी पू. आजींची सेवा केली. आम्ही पू. आजींना काही मासांपूर्वी गावी घेऊन गेलो होतो. त्या वेळी त्या दोघींनी पू. आजींचे सगळे नियोजन केले.

४. कुटुंबातील कर्तेपुरुष सेवेनिमित्त बाहेर असतांना दोघींनी कौटुंबिक दायित्व निभावणे
आम्ही पूर्णवेळ साधना करायला आरंभ करण्याच्या आधीपासूनच सौ. उर्मिला यांना घरातील सर्व सेवांची माहिती होती. सौ. रोहिणीचे आणि माझे लग्न रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झाले. त्यामुळे घरातील सेवांविषयी रोहिणीला अधिक माहिती नव्हती. रोहिणीला कुटुंबियांविषयी माहिती होणे आवश्यक होते आणि तिने ‘कुटुंबात राहून सेवा कशी करायची असते ?’, हा समष्टी भाव शिकणेही महत्त्वाचे होते. त्या वेळी आम्ही सर्व कुटुंबीय एकत्र रहात होतो.
प.पू. गुरुदेवांच्या कृपेने एकत्र कुटुंबात झालेल्या संस्कारांचे फळ म्हणजे आम्ही (मी आणि रामेश्वरदादा) सेवेनिमित्त बाहेर असतांना सौ. उर्मिला आणि सौ. रोहिणी सर्व व्यवस्थित सांभाळतात. आम्ही दोघेही त्यांच्या प्रती कृतज्ञ आहोत.
५. पू. आजींनी देहत्याग केल्यानंतर दोघींनी सर्व सेवा आणि विधी यांचे नियोजन करणे

पू. आजींनी देहत्याग करण्याच्या वेळी आम्ही दोघेही घरी नव्हतो. मी श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या समवेत दैवी दौर्यावर होतो आणि रामेश्वरदादा अहिल्यानगर येथे सेवेनिमित्त होता. तेव्हा या दोघींनी सर्व सेवा आणि विधी यांचे नियोजन केले. आम्हाला काही करावे लागले नाही.
‘प.पू. गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, आम्ही सर्व साधक कुटुंबीय अशा परिस्थितीत स्थिर राहून सेवा करू शकतो’, ही तुमची आमच्यावर मोठी कृपा आहे.’
– श्री. वाल्मिक भुकन, तिरुवण्णामलई, तमिळनाडू. (२१.१२.२०२४)