आपण सध्या एकविसाव्या युगात वावरत आहोत. विज्ञानाच्या साहाय्याने मनुष्याचे जीवन अत्यंत सुखकर झाले आहे. यातच आता कृत्रिम बुद्धीमत्तेची, म्हणजेच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ची भर पडली आहे. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी नुकताच देशाचा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला. यामध्ये त्यांनी वैद्यकीय क्षेत्रासमवेतच शिक्षणक्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करण्याचे घोषित केले. असे असले, तरी ‘शिक्षणक्षेत्रामध्ये कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर धोकादायक ठरू शकतो’, असे तज्ञांचे म्हणणे आहे.
शिक्षणात तात्त्विक अंग आणि प्रायोगिक अंग, अशी २ अंगे आहेत. प्राथमिक अंगामध्ये केवळ पुस्तकी ज्ञान दिले जाते; मात्र मिळालेले पुस्तकी ज्ञान उपयोगात कसे आणायचे ? हे प्रायोगिक अंगामध्ये शिकवले जाते. कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे मुलांना केवळ पुस्तकी ज्ञानाचे धडे दिले जातील, अशी भीती जाणकार व्यक्त करत आहेत. आधीच सामाजिक प्रसिद्धीमाध्यमे आणि भ्रमणभाष यांच्या अतीवापरामुळे मुलांचे इतरांशी मिसळण्याचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. याचे दुष्परिणाम समाजामध्ये घडणार्या विविध घटनांच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहेत. समाजामध्ये दिवसेंदिवस वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे. अपघात किंवा अडचणीच्या काळात एकमेकांना साहाय्य करण्याची समाजाची मानसिकता नष्ट होत चालली आहे. युवा भारत घडवतांना विद्यार्थ्यांना संस्कारक्षम घडवणे, हे शिक्षकांचे दायित्व आहे; मात्र शिक्षकांचे दायित्व कृत्रिम बुद्धीमत्तेने घेतले, तर मुलांना आधुनिक ज्ञान मिळेल; मात्र त्यांच्यावर अपेक्षित संस्कार होणार नाहीत. कृत्रिम बुद्धीमत्तेमुळे आधुनिक गोष्टी आणि अभ्यास मुलांपर्यंत पोचेल, हे जरी खरे असले, तरी मुलांमधील विचारशक्ती, कल्पनाशक्ती, निर्माणशक्ती याचे प्रमाण मात्र अल्प होऊ शकते. कृत्रिम बुद्धीमत्तेवर काम करत असतांना त्याचा वापर किती प्रमाणात करणार ? कसा करणार ? त्याचे चांगले आणि वाईट परिणाम काय ? याचा सारासार विचार करूनच ही प्रणाली वापरात आणली पाहिजे.
कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर प्रयोग म्हणून नवीन पिढीवर केला आणि तो प्रयोग फसला, तर पुढील कित्येक पिढ्यांची कधीही भरून न निघणारी हानी होऊ शकते. सशक्त आणि सुदृढ भारत निर्माण होण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेची आवश्यकता असली, तरी संस्कार आणि मैदानी खेळ हेही तितकेच आवश्यक आहेत. मुलांना माहिती केवळ कृत्रिम बुद्धीमत्तेतून आयती मिळायला नको, तर त्यांना त्यांच्या आणि इतरांच्या अनुभवातून आलेले ज्ञानही शिकायचे आहे. खरे शिक्षण हे शाळेत जाऊन, मित्रांसमवेत राहून शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली घेतले, तरच त्याचा चांगला उपयोग मुलांच्या जीवनामध्ये होऊ शकतो, हे निश्चित !
– श्री. राहुल देवीदास कोल्हापुरे, सातारा.