१. ‘संत साधकांना आध्यात्मिक त्रास दूर होण्यासाठी प्रतिदिन ठराविक घंटे विशिष्ट नामजप करण्यास सांगतात. डिसेंबर २०२४ मध्ये एकदा आध्यात्मिक उपायांसाठी ‘निर्गुण’ हा नामजप करतांना माझ्या मनात, ‘नामजपाने साधकांंवर आध्यात्मिक स्तरावरील उपाय कसे होतात ?’, असा प्रश्न आला. तेव्हा मला सूक्ष्मातून आकाशात फटाक्याचा बाण फुटल्यावर आगीच्या ठिणग्या निर्माण होतांनाचे दृश्य द़िसले. त्याप्रमाणे ‘निर्गुण’ हा नामजप करतांना मला माझ्या हृदयात सूक्ष्मातून सोनेरी आणि पांढरा या रंगांचे अनेक सूक्ष्म कण सिद्ध होऊन ते संपूर्ण शरिरात पसरतांना दिसले. त्यानंतर ‘त्या द़ैवी कणांमुळे शरिराच्या पेशीपेशींमधील काळे कण नष्ट होतात, तसेच शरिरात काही बाधा किंवा तंत्र याद्वारे निर्माण झालेल्या नकारात्मक आकृत्याही नष्ट होतात’, असेही मला जाणवले.

२. ‘शून्य’ या नामजपातून पांढरा आणि फिकट निळा या रंगांचे सूक्ष्म दैवी कण, ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ या नामजपाने सूक्ष्म निळे दैवी कण, तर ‘श्री दुर्गादेव्यै नमः ।’ या नामजपातून लाल रंगाचे सूक्ष्म दैवी कण साधकाच्या शरिरात निर्माण होतात.
३. प्रत्येक नामागणिक साधकाच्या शरिरात सूक्ष्म दैवी कणांची निर्मिती होते. या सूक्ष्म कणांची परिणामकारकता साधकाच्या साधनेवर अवलंबून असते.
४. नामजपातून निर्माण होणार्या सूक्ष्म दैवी कणांनी साधकाच्या शरिरातील रज-तमयुक्त सूक्ष्म काळे कण नष्ट होऊ लागतात. त्यामुळे साधकाला ‘शारीरिक त्रास न्यून होणे, हलकेपणा जाणवणे, मनाला उत्साह येणे, मन सकारात्मक होणे, ईश्वरी आनंद अनुभवणे आणि साधनेतील अडथळे न्यून होणे’ या अनुभूती येतात.
५. नामजप केल्याने साधकाला अनेक प्रकारचे लाभ होतात. त्यांपैकी एक लाभ वरील सूक्ष्म प्रक्रियेद्वारे वर्णन केलेला आहे.’
– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (ज्ञान मिळण्याचा दिनांक ९.१२.२०२४)
|