प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे सध्या चालू असलेल्या महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने विशेष भाग ४
‘मागील लेखात आपण विविध कुंभमेळ्यांच्या विविध तीर्थस्थळांचे महत्त्व जाणून घेतले. आज आपण कुंभमेळ्याच्या परिसरात घडणार्या अनुचित गोष्टी आणि त्याविषयी भाविकांचे कर्तव्य यांविषयी अधिक जाणून घेऊ.
भाग ३. वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/882855.html
१. कुंभक्षेत्राची सात्त्विकता टिकून ठेवण्यासाठी काय करावे ?
कुंभमेळ्याच्या परिसराचे पावित्र्य आणि सात्त्विकता जपण्यासाठी प्रयत्न करणे, हे स्थानिक पुजारी, मंदिरांचे विश्वस्त आणि प्रशासन यांच्यासमवेत त्या ठिकाणी येणार्या प्रत्येक यात्रेकरूचे कर्तव्य आहे.
१ अ. कुंभक्षेत्रामध्ये येणार्या अनेक भाविकांचे आचरण असे असते की, जणू काही ते एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी आले आहेत. ते एकमेकांशी विनोद करणे, पाश्चात्त्य पोशाख घालणे, चित्रपट संगीत ऐकणे, मांसाहारी पदार्थ खाणे इत्यादी कृत्ये करतात. असे वागून आपण कुंभमेळ्याचा लाभ घेऊ शकणार आहोत का ? लाभ तर होणार नाही; पण त्याच वेळी तीर्थक्षेत्राचे पावित्र्य न्यून करण्याच्या पापात आपण नक्कीच भागीदार होऊ शकतो. त्यामुळे आपण आपले आचरण धर्मानुसार ठेवणे आवश्यक आहे.
तीर्थक्षेत्री जाणे, ही ‘साधना’ आहे. हे साध्य करण्यासाठी तीर्थक्षेत्री भावपूर्ण गंगास्नान, देवतांचे दर्शन, दान-धर्म, उपास्यदेवतेचा नामजप इत्यादी करून शक्य तेवढा वेळ देवाशी आंतरिक अनुसंधान राखणे आवश्यक आहे. असे केल्याने गंगास्नान आणि प्रवास करण्याचे आध्यात्मिक पातळीवरील लाभ मिळतात.

१ आ. कुंभक्षेत्राच्या पवित्र तीर्थक्षेत्रात स्नान करणार्या यात्रेकरूंच्या काही कृतींमुळे तीर्थक्षेत्र प्रदूषित होते. काही लोक प्लास्टिकच्या पिशव्या, सिगारेटची पाकिटे, जुनी अंतर्वस्त्रे इत्यादी गोष्टी तीर्थस्थळी (नदीत किंवा कुंडामध्ये) फेकतात. त्यामुळे तीर्थक्षेत्राचे पावित्र्य न्यून होते. आपण अशी कृत्ये करू नयेत, यासाठी यात्रेकरूंनी सतर्क राहिले पाहिजे आणि इतरांनीही अशी कृत्ये करू नयेत; म्हणून आपण सावध राहिले पाहिजे.
१ इ. धर्मशास्त्रानुसार गंगा, गोदावरी आणि क्षिप्रा यांसारख्या पवित्र नद्यांना प्रदूषित करणे, हा एक मोठा अपराध आहे; म्हणून तीर्थक्षेत्राचे पावित्र्य जपण्यासाठी आपण स्नान करतांना खबरदारी घेणे आवश्यक आहे. पर्वस्नानाच्या वेळी यात्रेकरू मोठ्याने बोलणे, ओरडणे, एकमेकांवर पाणी उडवणे इत्यादी अनुचित गोष्टी करतात. अशी कृत्ये घडू नयेत; म्हणून आपण सतर्क राहिले पाहिजे.
२. साधूसंतांच्या मंडपांमध्ये भाविकांनी आदर्श आचरण करण्याचे महत्त्व
२ अ. साधूसंतांच्या मंडपामध्ये भाविकांनी आदर्श आचरणाचे पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कुंभ परिसरात साधूसंतांसाठी मंडप उभारण्यात येतात. या मंडपांमध्ये सत्संग (प्रवचन, भागवत कथा इत्यादी) आयोजित केले जातात. त्या वेळी काही भाविक तेथे झोपलेले आढळतात. सत्संगाच्या ठिकाणी देवतांचे अस्तित्व असते. त्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी झोपू नये. आवश्यकता असल्यास मंडपाच्या एका कोपर्यात आणि एका ओळीत झोपावे. त्या वेळी त्यांनी त्यांच्या साहित्याची काळजी घ्यावी.
२ आ. साधूसंतांच्या मंडपात अन्नदान चालू असते. तेथे जेवणारे काही लोक उरलेले अन्न ताटात सोडतात. ‘अन्न हे पूर्ण ब्रह्म’ आहे आणि ते वाया घालवणे पाप आहे. त्यामुळे भाविकांनी त्यांच्या ताटात आवश्यक तेवढेच अन्न घ्यावे. यासमवेतच पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळावा. भोजन केल्यानंतर पत्रावळी आणि इतर कचरा तेथेच टाकला जातो. तसे न करता ते कचर्याच्या डब्यात टाकावे. या खबरदारी घेतल्यास आपण कुंभमेळ्याचे पावित्र्य राखण्यास साहाय्य करू शकतो.
३. धर्मशिक्षणाच्या अभावी कुंभमेळ्याला येणार्या भाविकांकडून देवता आणि साधूसंत यांचा अवमान
अज्ञानामुळे भाविकांकडून देवता आणि साधूसंत यांचा अवमान होतो. त्यांनी साधूसंतांची थट्टा करू नये. काही यात्रेकरू जटाधारी, हठयोगी, नागा साधू आणि मुंडण केलेले भाविक यांची थट्टा करतात किंवा त्यांच्यावर टीका-टिपणी करतात. धर्मशास्त्रानुसार साधूसंतांची टीका करणे, हे एक मोठे पाप आणि अपराध आहे. पवित्र ठिकाणी मुंडण करणे, हा एक विधी आहे. हा विधी करणार्या व्यक्तीची चेष्टा करणे, म्हणजे धर्मशास्त्राचीच टीका करणे आहे की, जे पाप आहे.
४. देवतांचा अनादर थांबवून धर्मपालन करा !
विविध गोष्टींच्या माध्यमातून देवतांचा अनादर केला जातो. देवतांचा अनादर थांबवण्याचा प्रयत्न करणे, हे एक प्रकारचे धर्मपालन आहे.
४ अ. देवतांची चित्र असलेली उत्पादने खरेदी करू नका (उदा. देवतांची चित्र असलेले खोके, अगरबत्ती इत्यादी). अशा उत्पादनांचा वापर संपल्यानंतर त्यांची वेष्टने अनेकदा पायाखाली येतात किंवा कचर्याच्या डब्यात फेकली जातात. त्यामुळे अशी उत्पादने विकणार्यांचे प्रबोधन करावे.
४ आ. देवतांची चित्रे किंवा ‘ओम’सारखे धार्मिक प्रतीक असलेले कपडे घालू नका. ‘फॅशन’ (रूढी) किंवा भक्तीच्या नावाखाली बरेच लोक असे कपडे घालतात. आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, आपल्या देवता आपले श्रद्धास्थान आहे. त्यांचे स्थान देवघर किंवा मंदिर येथे आहे. आपण आपल्या कपड्यांवर देवतांची चित्रे आणि धार्मिक चिन्हे वापरली, तर त्याचे पावित्र्य जपणे आपल्याला शक्य नाही. कपडे धुतांना ते रंगहीन होतात किंवा त्यांवर डाग पडू शकतात. हे सर्व लक्षात घेऊन आपण असे कपडे घालू नयेत आणि इतरांचेही प्रबोधन करावे.
४ इ. अनेक ठिकाणी भिकारी देवतांच्या वेशात दिसतात. कुंभमेळ्यातही हे आढळते. जर एखादा भिकारी राजकारण्याचा पोशाख घालून भीक मागू लागला, तर त्याला कुणी भीक मागू देईल का ? लगेचच लोक आणि पक्षाचे कार्यकर्ते त्याला अडवतील आणि थांबवतील. मग आपण देवतांचा असा अनादर का सहन करतो ? आपण अशा ढोंगी लोकांना उघडे पाडले पाहिजे आणि त्यांना असे करण्यापासून थांबवले पाहिजे. त्यांचे प्रबोधन करूनही ते ऐकत नसल्यास धार्मिक भावना दुखावल्या; म्हणून त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करावी.
५. पवित्र स्थळांचे पावित्र्य भंग करण्याविषयी शास्त्राचे मत
५ अ. कुंभमेळ्याच्या काळात यात्रेकरूंनी पवित्र ठिकाणी काही वाईट कृत्य केले, तर त्यांना ५ व्या नरकाची शिक्षा दिली जाते; कारण ज्या क्षेत्रात अधिकाधिक चैतन्य असते, तेथे केलेल्या कोणत्याही दुष्कृत्यासाठी कठोर शिक्षा भोगावी लागते.
५ आ. कुंभमेळ्यात यात्रेकरूंनी केलेल्या पावित्र्य नष्ट करण्याच्या कृत्यांमुळे तेथे सूक्ष्म अनिष्ट शक्ती वाढतात. त्यांच्यामुळे जीवांच्या आध्यात्मिक साधनेत अडथळे निर्माण होऊ शकतात.
५ इ. कुंभमेळ्यासाठी हिंदू मोठ्या संख्येने जातात. त्याचप्रमाणे ते देशातील विविध तीर्थस्थळांनाही भेटी देतात; पण अशा पवित्र स्थळांच्या ठिकाणी आपल्याकडून तेथील पावित्र्य तर अल्प होत नाही ना, याकडे कुणीही लक्ष देत नाही. ब्रह्मांड पुराणात असे लिहिले आहे, ‘कुंभमेळ्याच्या वेळी नदीत कपडे धुणे, भांडी साफ करणे, कचरा टाकणे आणि मलमूत्र उत्सर्जित करणे इत्यादी १४ प्रकारच्या कृती निषिद्ध आहेत.’ सध्या लोक साबण वापरून नदीत अंघोळ करतात. असे कृत्य करणारे महापापी समजले जातात आणि त्यांना गोहत्येचे पाप लागते. जर आपण कुंभमेळ्यासाठी इतक्या दूरवरून गेलो, तर आपण शक्य तितके नामस्मरण, सेवा इत्यादी केली पाहिजे आणि अनुचित कृती टाळल्या पाहिजेत. जर दुसरे कुणी हे करत असेल, तर त्यालाही थांबवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
६. तीर्थक्षेत्रांमध्ये अयोग्यरित्या धार्मिक विधी करणारे पुरोहित
बर्याच वेळा आपण पहातो की, धार्मिक विधी करतांना पुरोहित अयोग्य वर्तन करतात. त्याविषयी त्यांना जाणीव करून देणे, हे आपले कर्तव्य होते. पुरोहितांना प्रत्येक विधी धार्मिक पद्धतीनुसार करण्याची विनंती करा. कुंभमेळ्यात पुरोहितांना यात्राविधी, श्राद्ध इत्यादी विधी करावे लागतात. पुरोहितांची कमतरता आणि भाविकांची लक्षणीय उपस्थिती यांमुळे अपूर्ण ज्ञान असलेले काही पुरोहित काही मिनिटांत आवश्यक विधी पूर्ण करतात. परिणामी यजमानाला त्या धार्मिक कृत्याचा पूर्ण लाभ मिळत नाही. त्यामुळे आपण काय करू शकतो, हे समजून घेतले पाहिजे.
६ अ. विधी चालू करण्यापूर्वी पुरोहिताला तो परिपूर्ण करण्याची विनंती करा.
६ आ. जे पुरोहित धार्मिक विधी योग्यरित्या करत नाहीत, त्यांच्या संदर्भात स्थानिक ‘पुरोहित संघ’ आहे, त्यांच्याकडे तक्रार करा.
६ इ. कोणताही धार्मिक विधी करण्यापूर्वी दक्षिणेविषयी पुरोहिताशी आधी चर्चा करा. साधारणपणे धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर दक्षिणा दिली जाते. जर काही यजमानांकडे तेवढे पैसे नसतील, तर त्यामुळे काही समस्या उद्भवू शकतात. इतर राज्यांमध्ये अशा घटना टाळण्यासाठी दक्षिणेच्या संदर्भात धार्मिक विधी करण्यापूर्वी संबंधित पुजार्याशी चर्चा करून निर्णय घ्यावा.
७. कुंभमेळ्यात कर्तव्यचुकारपणा करणार्या पोलिसांना जाणीव करून देणे आवश्यक !
कुंभक्षेत्रात कर्तव्य बजावत नसलेल्या पोलिसांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली पाहिजे. काही पोलीस बाहेरून कुंभमेळ्यात येणारे संत आणि भाविक यांना योग्य मार्ग न दाखवणे, गुंडगिरी न थांबवणे, जुगार खेळणार्यांना न थांबवणे इत्यादी गोष्टी करून कर्तव्यात कसूर दाखवतात. भाविकांनी अशा दायित्वशून्य पोलिसांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून दिली पाहिजे. त्यानंतरही पोलीस त्यांचे कर्तव्य योग्यपणे बजावत नसतील, तर त्यांच्याविरुद्ध त्यांच्या वरिष्ठांकडे तक्रार करा.
एकंदरीत, तीर्थक्षेत्राचे पावित्र्य, प्रतिष्ठा आणि पावित्र्य जपण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत. कुंभक्षेत्रात इतरांनी कोणतेही चुकीचे कृत्य करू नये; म्हणून आपण प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे.’
– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.
रांगेत उभे राहून देवतेचे दर्शन घेणे, ही तपश्चर्याच !![]() ![]() देवतेचे जलद दर्शन घेण्यासाठी भक्तांनी अवैधपणे पैसे देऊ नयेत. कुंभमेळ्याच्या वेळी देवतेचे दर्शन घेण्यासाठी काही घंटे रांगेत उभे रहावे लागते. ते टाळण्यासाठी काही भाविक अवैधपणे प्रति व्यक्ती १०० ते २०० रुपये देतात आणि रांगेत उभे न रहाता दर्शन घेतात. असे करणे, म्हणजे लाच देणे होये. तीर्थयात्रा ही एक प्रकारची तपश्चर्या आहे. देवतेचे दर्शन घेण्यासाठी काही घंटे रांगेत उभे राहणे, हा तपश्चर्येचा एक भाग आहे. त्यात सवलत घेणे योग्य नाही. देवतेच्या दर्शनासाठी रांगेत उभे रहातांना अनावश्यक न बोलता परमेश्वराचे नामस्मरण करावे. – श्री. रमेश शिंदे |
कुंभमेळ्यात गंगास्नान करतांना गंगामातेला करावयाच्या प्रार्थनागंगा नदीत स्नान करणार्या व्यक्तीचे मन तीर्थक्षेत्राचे पावित्र्य आणि सात्त्विकता अनुभवत नसेल, तर त्याचे पाप नष्ट होणे अशक्य आहे. त्यामुळे पर्वस्नानाचा आध्यात्मिक लाभ मिळवण्यासाठी प्रारंभी गंगामातेला खालील प्रार्थना करावी. अ. हे गंगामाते, तुझ्या कृपेने मला या कुंभमेळ्यात स्नान करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे मी तुझ्या चरणी कृतज्ञ आहे. हे आई, मला आशीर्वाद दे की, मी तुझ्या या पवित्र ठिकाणी श्रद्धायुक्त अंत:करणाने पर्वस्नान करू शकेन, अशी कृपा कर. २ आ. हे पापविनाशिनी गंगादेवी, कृपया माझे सर्व पाप दूर कर. हे मोक्षदायिनी देवी, माझ्या आध्यात्मिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली साधना माझ्याकडून करवून घे आणि मला मोक्षाकडे घेऊन चल. यानंतर देवतेचा नामजप करत स्नान करावे. – श्री. रमेश शिंदे कुंभक्षेत्री मंदिरांचे पावित्र्य टिकवण्यासाठी काय करावे ?मंदिर हे सात्त्विकतेचे उगमस्थान आहे. त्यांची शुद्धता न राखणे, हा एक गंभीर अपराध आहे; परंतु बर्याचदा तेथे पर्यटनासाठी येणार्या लोकांकडून हे पावित्र्य राखले जात नाही. अ. तीर्थक्षेत्री स्नान केल्यानंतर अनवाणी पायांनी परतणार्या भाविकांच्या पायाला माती किंवा चिखल लागलेला असतो. त्याच परिस्थितीत ते मंदिरात प्रवेश करतात. त्यामुळे सर्वत्र गढूळ पाणी पसरते. त्यामुळे मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी त्यांनी त्यांचे पाय धुवून आणि पुसून घेतले पाहिजे. आ. जे लोक जोडे आणि चप्पल वापरतात, त्यांनी ते एका ओळीत ठेवावे आणि पाय धुऊन अन् पुसून मंदिरात प्रवेश करावा. इ. दर्शनासाठी गर्दी करू नये. रांगेत उभे रहावे आणि शांतपणे दर्शन करावे. ई. मंदिर परिसरात मोठ्याने बोलणे, मोठ्याने विविध स्तोत्रे म्हणणे, आवाज करणे इत्यादी गोष्टी इतरांच्या पूजेमध्ये अडथळा निर्माण करतात. त्यामुळे असे करू नये. उ. मंदिराचा परिसर स्वच्छ ठेवावा. निर्माल्याचे अवशेष निर्माल्यपेटीत टाकावे, तसेच अगरबत्ती, काडीपेटी इत्यादींची वेष्टणे कचर्याच्या डब्यात टाकावीत. – श्री. रमेश शिंदे |