कुंभक्षेत्रांचे अद्वितीय महत्त्व आणि आध्यात्मिक लाभ !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे सध्या चालू असलेल्या महाकुंभमेळ्याच्या निमित्ताने विशेष भाग ३

भाग २. वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/880349.html

१. उज्जैन तीर्थक्षेत्राचे माहात्म्य

उज्जैन हे तीर्थक्षेत्र मध्यप्रदेशातील क्षिप्रा नदीच्या काठावर वसलेले आहे. हे पवित्र शहर अवंतिकासारख्या अनेक नावांनी प्रसिद्ध आहे. पृथ्वीच्या कर्कवृत्ताचा उगम येथून होतो. प्राचीन काळी भगवान शंकरांनी येथे त्रिपुरासुराचा पराभव केला होता. त्यामुळे या जागेला ‘उज्जयिनी’ असे नाव देण्यात आले. अवंतिका, म्हणजेच उज्जैन शहर होय. या शहराचा अयोध्या, मथुरा, माया इत्यादी ७ मोक्ष देणार्‍या शहरांमध्ये समावेश आहे. येथे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एकाला महाकाल ज्योतिर्लिंग म्हणतात. भक्तांचा असा विश्वास आहे की, महाकालाचे दर्शन घेतल्याने अकाली मृत्यू टाळता येतो आणि मुक्ती मिळते. ५१ शक्तीपीठांपैकी एक असलेल्या ‘हरिसिद्धिदेवी’चे प्राचीन मंदिर येथे आहे. येथील श्री मंगलनाथ मंदिराचे विशेष महत्त्व आहे. पुराणांमध्ये ‘उज्जैन’ हे मंगळाचे जन्मस्थान असल्याचा उल्लेख आहे. जेव्हा गुरु सिंह राशीत असतो आणि सूर्य मेष राशीत असतो, तेव्हा उज्जैनमध्ये सिंहस्थ कुंभमेळा आयोजित केला जातो. वैशाख पौर्णिमेला हा उत्सव असतो आणि त्या दिवशी मुख्य अमृत (शाही) स्नान केले जाते. याखेरीज चैत्र पौर्णिमा, चैत्र अमावास्या, अक्षय्य तृतीया, एकादशी इत्यादी दिवशीही येथे उत्सव स्नान केले जाते. वैशाख मासात उज्जैनच्या क्षिप्रा नदीत स्नान करणे विशेषतः शुभकारक असते. काशीमध्ये अनेक वर्षे राहून मिळणारे पुण्य वैशाख मासात येथे केवळ ५ दिवस राहून मिळू शकते. माघ मासात प्रयाग परिसरात, कार्तिक मासात पुष्कर परिसरात आणि वैशाख मासात उज्जैनी परिसरात स्नान केल्याने पापे धुऊन जातात.

श्री. रमेश शिंदे

२. त्र्यंबकेश्वर, नाशिक क्षेत्राचा महिमा

अ. त्र्यंबकेश्वर, नाशिक हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे. ३ डोळे असलेले भगवान शंकर ज्या ठिकाणाची देवता आहेत, ते स्थान त्र्यंबकेश्वर आहे. हे १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. लक्ष्मणाने येथे शूर्पणखेचे नाक आणि कान कापले होते. त्यामुळे हा परिसर ‘नाशिक’ या नावाने प्रसिद्ध झाला. वेगवेगळ्या कालखंडात त्याच्या वेगवेगळ्या नावांचे संदर्भ आहेत. गौतम ऋषींनी त्यांच्या पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली आणि आपल्या तपश्चर्येच्या शक्तीने त्यांनी भगवान शिवाला स्वर्गातून पृथ्वीवर गंगा आणण्याची प्रार्थना केली. त्यानंतर गंगामाता त्र्यंबकेश्वरमध्ये ‘गौतमी’, म्हणजेच ‘गोदावरी’ स्वरूपात अवतरित झाली. त्या वेळी गुरु ग्रह सिंह राशीत होता. ज्या काळात पृथ्वीवर केवळ ७ देव, ७ ऋषी आणि ७ मानव होते, त्या काळात केवळ गौतमी होती. त्यामुळेच गोदावरीला मूळ आणि महान नदी होण्याचा मान मिळाला. ‘कुरुक्षेत्रात दान केल्याने, नर्मदेच्या काठावर तपश्चर्या केल्याने आणि गंगेच्या काठावर मृत्यूमुखी पडल्याने विशेष पुण्य मिळते’, असे म्हटले जाते; परंतु गोदावरी नदीच्या काठावर वरील ३ कृत्ये केल्याने संबंधित व्यक्तीला मोक्ष मिळतो.

आ. ‘गोदावरीचा दक्षिणेकडील प्रवाह दुर्मिळ आणि मोक्षदायी आहे; म्हणून या क्षेत्रात केलेल्या दान-पुण्याचे फळ मिळते’, असे या क्षेत्राच्या महिम्यात म्हटले आहे. येथे ब्रह्मगिरी नावाचा शिवरूपी पर्वत आहे. पापांपासून मुक्ती देणारे कुशावर्त नावाचे तीर्थक्षेत्र येथे आहे. कुशावर्त तीर्थाक्षेत्रामध्ये स्नान केल्याने व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होते आणि त्याचे पूर्वजही संतुष्ट होतात.

इ. रामतीर्थ : वनवास काळात प्रभु श्रीराम पंचवटीत असतांना त्यांनी भगवान शिवाला प्रार्थना केली, ‘हे भगवान शिव, ज्यांचे पूर्वज नरकात आहेत, त्यांनी येथे पिंडदान केले, तर त्यांचे नरकात रहाणारे पूर्वज स्वर्गात जावे, तसेच येथे स्नान केल्याने आयुष्यभर केलेली सर्व मानसिक, शाब्दिक आणि शारीरिक पापे नष्ट व्हावीत.’ ही प्रार्थना ऐकून भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी प्रभु श्रीरामाला तसे वरदान दिले. तेव्हापासून हे ठिकाण ‘रामतीर्थ’ या नावाने प्रसिद्ध झाले. (संदर्भ : ब्रह्मपुराण) ‘रामतीर्थ’ भ्रूणहत्येच्या पापाचा नाश करण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यांचे नाव ऐकल्याने सर्व पापांपासून मुक्तता मिळते. येथे राखेचे विसर्जन करणे, पुण्यपूर्ण मानले जाते. अस्थीविलय तीर्थात साडेतीन घटिकांमध्ये (८४ मिनिटांत) हाडे पाण्यात पूर्णपणे विरघळतात. हिंदु धर्मशास्त्र नाकारणार्‍या शास्त्रज्ञांसाठी ही एक चपराक आहे.

ई. सिंहस्थ कुंभमेळा : जेव्हा गुरु ग्रह सिंह राशीत असतो आणि सूर्य हाही सिंह राशीत असतो, तेव्हा नाशिक, त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा आयोजित केला जातो. हा उत्सव भाद्रपद कृष्ण पक्ष पंचमी, भाद्रपद कृष्ण पक्ष अमावास्या आणि भाद्रपद शुक्ल पक्ष पंचमी (केवळ नाशिकमध्ये), तर वामन जयंतीला (केवळ त्र्यंबकेश्वरमध्ये) पर्वकाळ असतो. या दिवशी अमृत स्नान (शाहीस्नान) केले जाते. सिंहस्थ महापर्वात गोदावरीमध्ये स्नान केल्याने सर्व तीर्थस्थळांमध्ये स्नान केल्याचे फळ मिळते. स्कंद पुराणात असे म्हटले आहे की, जेव्हा गुरु सिंह राशीत असतो, तेव्हा सर्व तीर्थक्षेत्रे, नद्या, महासागर, प्रदेश, अरण्य आणि आश्रम गोदावरी नदीच्या काठावर (सूक्ष्म स्वरूपात) एक वर्षासाठी रहातात. ६० सहस्र वर्षे भागीरथी (गंगा) नदीत स्नान केल्याने जेवढे पुण्य मिळते, तेवढेच पुण्य गुरु सिंह राशीत असतांना गोदावरी नदीत नेवळ एकदा स्नान केल्याने मिळते. सिंहस्थ तीर्थयात्रा करण्याच्या पद्धतीमध्ये पुण्याहवाचन आणि नंदी श्राद्ध करणे अन् गोदावरीमध्ये स्नान करणे समाविष्ट आहे. त्यानंतर तेथे श्राद्ध आणि इतर विधी करणे, पंचवटीत स्थित श्रीरामाचे दर्शन घेणे, कुशावर्तात पितृप्रसाद अर्पण करणे, भगवान त्र्यंबकेश्वर आणि श्रीराम यांचे दर्शन घेणे यांचा समावेश आहे. पंचवटीत गोदावरीची पूजा करणे, फळे असलेले अर्घ्य अर्पण करणे, ब्राह्मणांना दान करणे, मुंडण करणे, विनामिठाचा उपवास करणे आदी सांगण्यात आले आहे.

मोक्षदायी प्रयागराजचे माहात्म्य

प्रयाग हे उत्तरप्रदेशातील गंगा, यमुना आणि सरस्वती (ही नदी अदृश्य आहे.) या नद्यांच्या पवित्र ‘त्रिवेणी संगमा’वर वसलेले एक तीर्थक्षेत्र आहे. या पवित्र संगमामुळे त्याला ‘प्रयागराज’ किंवा ‘तीर्थराज’ असे म्हणतात. प्रयाग हे सर्व प्रकारच्या यज्ञांसाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. हरवलेले ४ वेद पुन्हा सापडल्यानंतर प्रजापतीने येथे एक महान यज्ञ केला; म्हणून प्रयागाला ‘प्रजापति क्षेत्र’ असेही म्हणतात. ब्रह्मदेवाच्या कुरुक्षेत्र, गया, विराज, पुष्कर आणि प्रयाग या ५ यज्ञवेदींपैकी प्रयाग ही मधली वेदी आहे. काशी, प्रयाग आणि गया या ३ ठिकाणांच्या प्रवासात प्रयाग हे ठिकाण धार्मिक दृष्टीकोनातून अद्वितीय आहे. या प्रदेशाचे महत्त्व सांगतांना असे म्हटले जाते, ‘महाप्रलयाच्या काळात संपूर्ण जग बुडाले, तरी प्रयाग बुडणार नाही.’ असे म्हटले जाते की, प्रलयाच्या शेवटी भगवान विष्णु येथे अक्षय्यवट वृक्षावर बालकाच्या रूपात विश्रांती घेतील. त्याचप्रमाणे सर्व देव, ऋषी आणि सिद्ध येथे रहातील अन् या क्षेत्राचे रक्षण करतील. असे म्हटले जाते की, जेथे गंगा आणि यमुना नद्या एकत्र येतात, तेथे स्नान करणार्‍यांना स्वर्ग मिळतो अन् या संगमावर आपले शरीर अर्पण करणार्‍या धीरवान पुरुषांना मोक्ष मिळतो. पुराणांमध्ये याला ‘सर्वोत्तम तीर्थक्षेत्र’ म्हटले आहे. महाभारताच्या तिसर्‍या अध्यायातही म्हटले आहे की, या प्रदेशाची माती शरिरावर लावल्याने व्यक्ती त्याच्या पापांपासून मुक्त होते. प्रयागराजच्या यात्रेला जातांना त्रिवेणी संगमाची पूजा, केस मुंडण, गंगा स्नान, पूर्वजांचे श्राद्ध, सौभाग्यवती महिलांनी वेणीदान करणे आणि देवतांचे दर्शन घेणे इत्यादी आवश्यक विधी करावे लागतात. जेथे सात्त्विक नद्या एकत्र येतात, ते ठिकाण अधिक सात्त्विक असते. गंगा आणि यमुना दोन्ही नद्या पवित्र असल्याने त्यांच्या संगमावर उपस्थित असलेली स्पंदने (शक्ती, चैतन्य इत्यादी) लाभदायक आहेत. त्यांच्यातून अधिक प्रमाणात सात्त्विकता निर्माण होते. – श्री. रमेश शिंदे

३. कुंभमेळ्यामध्ये सहभागी झाल्याने मिळणारे आध्यात्मिक लाभ 

अ. कुंभमेळा अत्यंत पुण्यदायी असल्याने त्या वेळी प्रयाग, हरद्वार (हरिद्वार), उज्जैन आणि त्र्यंबकेश्वर, नाशिक येथे स्नान केल्याने अनंत पुण्य मिळते. त्यामुळे या ठिकाणी कोट्यवधी संत आणि भाविक जमतात.

आ. कुंभमेळ्याच्या वेळी अनेक देवता, मातृका, यक्ष, गंधर्व आणि किन्नर पृथ्वीच्या कक्षेत सक्रीय रहातात. साधना केल्याने या सर्वांचे आशीर्वाद मिळतात आणि अल्प काळात कार्यसिद्धी होते.

इ. कुंभमेळा गंगा, यमुना, सरस्वती, गोदावरी आणि क्षिप्रा नद्यांच्या काठावर भरतो. या वेळी नदीच्या पवित्र क्षेत्रात अनेक देव, पुण्यात्मे, ऋषिमुनी आणि कनिष्ठ गण रहातात. यामुळे त्यांचे आशीर्वाद मिळवण्यातही साहाय्य होते.

ई. या काळात केलेल्या पुण्यकर्मांचे फळ इतर काळात केलेल्या पुण्यकर्मांपेक्षा अनंत प्रमाणात अधिक असते. या काळातील कृत्य कर्माला पूरक असते आणि या कृत्याला कर्माची संमती मिळते.

उ. कुंभमेळ्याच्या काळात सर्वत्र आपतत्त्वदर्शक पुण्य लहरींचे भ्रमण होत असते. त्यामुळे व्यक्तीचे मन शुद्ध होते आणि त्यात निर्माण होणार्‍या विचारांनी कृत्यही फलदायी बनते. अर्थात् कृती आणि कर्म दोन्हींची शुद्धी होते.

ऊ. पापक्षालक : पवित्र तीर्थस्थळांमध्ये स्नान करून पाप धुतले जावे, यासाठी अनेक भाविक कुंभक्षेत्रात स्नान करतात.

ए. पितृतर्पण : गंगा नदीचे कार्य ‘पूर्वजांना मुक्त करणे’ आहे. या कारणास्तव कुंभमेळ्यात गंगा स्नानासमवेत पितरांना नैवेद्य दाखवण्याची धर्माज्ञा आहे. ‘वायुपुराणा’मध्ये ‘कुंभमेळ्याचे वर्णन श्राद्धविधी करण्यासाठी योग्य’, असे वर्णन केले आहे.

ऐ. संतसत्संग : भारतातील विविध पिठांमधील शंकराचार्य, १३ आखाड्यांमधील तपस्वी संत, महामंडलेश्वर, शैव आणि वैष्णव पंथातील अनेक विद्वान, संन्यासी, संत अन् महात्मे कुंभमेळ्यात एकत्र येतात. त्यामुळे कुंभमेळ्याचे स्वरूप संपूर्ण भारतातील संतांच्या संमेलनाइतकेच भव्य आणि दिव्य असते. कुंभमेळ्यातील भाविकांना संतांच्या सत्संगाची सर्वांत मोठी संधी मिळते.’

– श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती.

महाकुंभमेळा, कुंभमेळा, अर्धकुंभमेळा आणि माघमेळा

प्रयाग येथील गंगा, यमुना आणि सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमावर प्रति १२ वर्षांनी कुंभमेळा भरतो. असा कुंभमेळा जो १४४ वर्षांनंतर येतो, तो ‘महाकुंभमेळा’ म्हणून ओळखला जातो. १२ वर्षांनी होणार्‍या कुंभमेळ्यानंतर ६ वर्षांनी होणार्‍या कुंभमेळ्याला ‘अर्धकुंभमेळा’ म्हणतात. या पवित्र त्रिवेणी संगमावर प्रतिवर्षी माघ मासात एक मेळा भरतो. याला ‘माघमेळा’ म्हणतात. माघ मासाच्या  अमावास्येला स्नान करण्यासाठी साधू आणि संन्यासी यांची मोठी गर्दी जमते. पद्मपुराण, अग्निपुराण, ब्रह्मपुराण, मत्स्यपुराण आणि महाभारत यांमध्ये या ठिकाणी स्नान करण्याचे अनेक लाभ सांगितले आहेत. येथे राहून भाविक कल्पवासाचे व्रत पाळतात.

प्रयागमधील यमुनेच्या काठावरील अक्षय्यवटाचे महत्त्व

अक्षय्यवट

प्राचीन आणि पवित्र वटवृक्ष अक्षय्यवट हा प्रयागमध्ये यमुनेच्या काठावर आहे. सर्व देवतांचे निवासस्थान असलेल्या अक्षय्यवट वृक्षाची मुळे पाताळापर्यंत पसरलेली आहेत. वायु, मत्स्य, कूर्म, पद्म, अग्नि आणि स्कंद या पुराणांमध्ये असे म्हटले आहे, ‘अक्षय्यवट वृक्षाजवळ आपले जीवन अर्पण केल्याने मोक्ष मिळतो.’ १७ व्या शतकाच्या प्रारंभी मोगल सम्राट अकबराने प्रयागराजमध्ये यमुनेच्या काठावर सुरक्षेसाठी किल्ला बांधण्याचे कारण सांगून अक्षय्यवट आणि संकुलातील मंदिरे नष्ट केली. जेथे अक्षय्यवट होता, तेथे किल्ल्यात त्याने ‘राणी महाल’ बांधला.

काही काळानंतर तेथे पुन्हा अक्षय्यवट वृक्ष उगवला. मग अकबराचा मुलगा जहांगीरने त्याला जाळून नष्ट करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. जहांगीरने गरम तवा ठेवून झाडाला मुळांसह नष्ट करण्याचा प्रयत्न केला; पण प्रत्येक वेळी या अक्षय्यवटातून नवीन कोंब फुटत आणि पुढे त्या झाडाचे रूप धारण करत. जहांगीरने अक्षय्यवट वृक्ष तोडल्यानंतरही तो पुन्हा वाढल्याचे पुरावे वर्ष १६९३ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘खुलासत उत्वारीख’ या पुस्तकात आहेत. आजही हा प्राचीन वृक्ष यमुना नदीच्या काठावरील या किल्ल्यात उभा आहे. हिंदूंना मोक्ष मिळू नये; म्हणून मोगल सम्राटांनी येथे जाण्यावर बंदी घातली होती. नंतर ब्रिटिशांनीही ही बंदी चालू ठेवली. स्वातंत्र्यानंतर किल्ल्याचे भारतीय सैन्याच्या शस्त्रागारात रूपांतर करण्यात आले आणि तेथील सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली. या अक्षय्यवट वृक्षाला भेट देण्याची अनुमती वर्षातून एकदा माघमेळा आणि कुंभमेळा यांच्या काळात दिली जाते. इतर वेळी भाविकांना किल्ल्यातील झाडाचे खोड दूरवरून दाखवले जाते. वर्ष २०१३ च्या कुंभमेळ्याच्या वेळी हिंदूंना वर्षभर अक्षय्यवटला भेट देण्याची अनुमती देण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कारणास्तव आता हिंदूंना प्रतिदिन किल्ल्यावर जाता येते आणि पाताळपुरी मंदिर, सरस्वती विहीर अन् अक्षय्यवट येथे भेट देता येते.

– श्री. रमेश शिंदे

भाग ४. वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/885088.html