
बेळगाव – येथे रिक्शाचालक मुजाहिद शकील जमादार याने १५ फेब्रुवारीला केलेल्या मारहाणीनंतर गोव्यातील फोंडा येथील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे माजी आमदार आणि गोव्याचे माजी पोलीस उपअधीक्षक लवू मामलेदार (वय ६८ वर्षे) यांचे निधन झाले. रिक्शाचालक जमादार (वय २८ वर्षे) याला अटक करण्यात आली असून त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंद झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लवू मामलेदार हे बेळगाव येथील खडेबाजार परिसरात असलेल्या श्रीनिवास लॉजमध्ये उतरले होते. दुपारी ते त्यांची गाडी घेऊन जात असतांना त्यांची एका रिक्शाला धडक बसली. यावरून मामलेदार आणि रिक्शाचालक यांच्यात वादावादी झाली. या वेळी रिक्शाचालकाने मामलेदार यांच्या कपाळावर जोरदार प्रहार केला. ते तेथील स्वागतकक्षाजवळ कोसळले. लॉजच्या व्यवस्थापकाने लगेचच पोलिसांना हे कळवले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन मामलेदार यांना जिल्हा रुग्णालयात भरती केले. आधुनिक वैद्यांनी पडताळणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. पोलीस अधीक्षक भीमाशंकर गुळेद यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिली.
Goan Reporter News: CCTV Footage showing EX Ponda MLA Lavoo Mamledar being attacked
Goan Reporter News: CCTV Footage of Former Ponda MLA Lavoo Mamledar Collapsing Due to Heart Attack (सौजन्य : Goan Reporter News) |
बेळगाव येथे शवविच्छेदन करून लवू मामलेदार यांचा मृतदेह गोव्यात रात्री परत आणण्यात आला. शवविच्छेदनाच्या अहवालात वास्तविक कारण स्पष्ट होईल. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मामलेदार यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला असून, मामलेदार यांना न्याय मिळवून देण्यासाठी गोवा पोलीस प्रशासन बेळगावच्या त्यांच्या समकक्षांशी संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले.
लवू मामलेदार आणि सनातन संस्था !
लवू मामलेदार हे प्रारंभीपासून सनातन संस्थेचे हितचिंतक होते. सनातनच्या कार्याला त्यांचे नेहमी सहकार्य असायचे. त्यांची पत्नी शांती मामलेदार या सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करतात. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या एका वर्धापनदिन सोहळ्याला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांची सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर श्रद्धा होती. लवू मामलेदार यांच्या पश्चात त्यांची पत्नी शांती मामलेदार, तसेच २ मुली अक्षता आणि अश्वेता, असा परिवार आहे. त्यांचे भाऊ श्री. श्रीहरि मामलेदार आणि बहीण सुश्री (कु.) राजश्री मामलेदार हे सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करतात.
‘दिवंगत लवू मामलेदार यांना सद्गती मिळो’, अशी सनातन परिवाराच्या वतीने भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !
लवू मामलेदार यांची राजकीय कारकीर्द
३ मार्च २०१२ या दिवशी गोव्यात झालेल्या निवडणुकीत ते मगो पक्षाकडून फोंडा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यापूर्वी त्यांनी पोलीस खात्यातील सेवेतून उपअधीक्षक म्हणून स्वेच्छा निवृत्ती घेतली होती. पोलीस सेवेत येण्यापूर्वी फोंड्यातील आल्मेदा हायस्कूलमध्ये त्यांनी शिक्षक म्हणून काम केले होते. वर्ष २०१२ मध्ये काही काळ ते गोवा हस्तकला महामंडळाचे अध्यक्ष होते. त्यानंतर वर्ष २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.