‘५.२.२०२५ या दिवशी शिरोडा (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील कै. रामकृष्ण गोविंद गावडे (वय ८३ वर्षे) यांचे निधन झाले. १४.२.२०२५ या दिवशी त्यांच्या निधनानंतरचा १० वा दिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या कुटुंबियांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

१. सौ. साधना अशोक भागवत (कै. रामकृष्ण गोविंद गावडे यांची मोठी मुलगी), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
१ अ. गुरुपौर्णिमा उत्सव आणि सत्संग यांचे ठिकाण दूर असूनही वडिलांनी तेथे जाण्याची अनुमती देणे : ‘आरंभी आम्हाला आमच्या गावापासून दूर असलेल्या ठिकाणी आयोजित केलेल्या सनातनच्या गुरुपौर्णिमेचे निमंत्रण मिळाले होते. त्या संदर्भात मी बाबांना सांगितले. तेव्हा त्यांनी मला गुरुपौर्णिमेला जाण्याची अनुमती दिली आणि बससाठी पैसेही दिले. काही दिवसांनी शिरोडा येथे आमच्या गावात सत्संग चालू झाला. सत्संगाचे ठिकाण आमच्या घरापासून अडीच कि.मी. दूर होते. आम्हाला घरी परत यायला रात्रीचे १० वाजत असत, तरीही बाबांनी मला सत्संगाला जाण्याची अनुमती दिली.
१ आ. घरची स्थिती बेताची असूनही मुलांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी अनुमती देणे : काही कालावधीनंतर कुटुंबातील सर्व जण साधना करू लागले. त्या वेळी माझ्या दोन्ही भावांचे (संदीप आणि संतोष यांचे) शिक्षण नुकतेच पूर्ण झाले होते. उदरनिर्वाहासाठी पैसे कमावणे आवश्यक असतांनाही बाबांना ‘सर्वांनी साधना करावी’, असे वाटले. त्यामुळे आम्ही तिघा भावंडांनी पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतला.’ (आता माझा भाऊ संदीप नोकरी करून साधना करत आहे.)
१ इ. मी बाबांच्या अंतिम समयी त्यांच्या कपाळावर विभूती लावली होती. त्या विभूतीच्या ठिकाणी ‘ॐ’ उमटला होता.’

‘दिवंगत रामकृष्ण गोविंद गावडे यांची देवावर गाढ श्रद्धा होती. घरची आर्थिक परिस्थिती बेताची असूनही त्यांनी स्वतःच्या मुलांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी प्रोत्साहन दिले. त्यांनी त्यांच्या नातवंडांवरही साधनेचे संस्कार केले. त्यांनी मुले आणि सुना यांच्याकडून कसलीच अपेक्षा केली नाही. त्यांच्यामधील ‘सतत कार्यमग्न असणे, इतरांचा विचार करणे, निरपेक्षपणे वागणे आणि शेवटच्या क्षणापर्यंत नामाच्या अनुसंधानात असणे’, या गुणांमुळे मृत्यूसमयी त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झाली आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
२. श्री. संदीप रामकृष्ण गावडे (कै. रामकृष्ण गोविंद गावडे यांचा मुलगा), शिरोडा, सिंधुदुर्ग.
२ अ. प.पू. परुळेकर महाराज यांनी साधकाच्या वडिलांविषयी काढलेले कौतुकोद्गार : ‘आम्ही कुटुंबीय २० वर्षांपूर्वी मालवण येथील संत प.पू. परुळेकर महाराज यांच्या दर्शनाला गेलो होतो. तेव्हा महाराजांनी त्यांच्या दिव्य दृष्टीने माझ्या बाबांना सांगितले, ‘‘तू पायाळू आहेस आहेस. तू चुलीतील राख जरी समोरच्या व्यक्तीला लावलीस, तरी ती विभूतीसारखे कार्य करील.’’
२ आ. देवतांनी दिलेला कौल प्रमाण मानून कृती करणे : बाबा ६० वर्षांचे असतांना एकदा गंभीर रुग्णाईत झाले. त्या वेळी त्यांनी कुटुंबियांचा आधार न घेता स्वतःला ठाऊक असलेली औषधे घेतली आणि ते बरे झाले. हे उपचार करतांना त्यांनी त्यांची ग्रामदेवता आणि श्री देव पूरमार यांच्यावर गाढ श्रद्धा ठेवली. ते नेहमी या देवतांनी दिलेला कौल प्रमाण मानून कृती करायचे.
२ इ. देवाप्रती भाव : बाबा आम्हाला सांगत असत, ‘‘मला मरणाचे भय नाही आणि काळजी नाही.’’ ते माझ्या बहिणीला म्हणायचे, ‘‘तू मला का भरवत आहेस ? माझे पोट भरते. देव मला घास भरवत आहे.’’
३. श्री. संतोष गावडे (कै. रामकृष्ण गोविंद गावडे यांचा धाकटा मुलगा), कोल्हापूर सेवाकेंद्र
३ अ. प्रापंचिक वादातून काही व्यक्तींनी वडिलांवर आरोप करणे आणि वडिलांनी याविषयी ग्रामदेवतेला सांगितल्यावर त्या ‘केसेस’ रहित होणे : ‘बाबांची ग्रामदेवतेवर अतूट श्रद्धा होती. त्यांनी प्रत्येक गोष्ट ग्रामदेवतेवर सोपवली. त्यांनी कुठल्याही प्रसंगात देवाला विचारून आणि देवाने सांगितलेल्या कौल प्रसादावर विश्वास ठेवून सर्व गोष्टी केल्या. एकदा घरातील प्रापंचिक वादातून त्यांच्यावर एकाच वेळी ७ ‘चॅप्टर केसेस’ (पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधक कारवाईची प्रकरणे)’ नोंदवल्या होत्या. त्याचे ‘वॉरंट’ (एखाद्याला अटक करण्यासाठीचे दस्तऐवज) आले. त्या वेळी त्यांनी प्रथम ते ‘वॉरंट’ ग्रामदेवतेच्या समोर नेऊन ठेवले आणि सांगितले, ‘तू याचा निर्णय घ्यायचा. नंतर ‘गावात रहायचे कि नाही, ते मी ठरवतो.’ दुसर्या दिवशी खोट्या केसेस करणार्यांनी सांगितले, ‘‘आम्हाला घरातील एका व्यक्तीने हे करण्यास भाग पाडले होते. आमच्याकडून चूक झाली. आम्ही न्यायालयात साक्ष देतो.’’ शेवटी सर्व ‘केसेस’ रहित झाल्या.
३ आ. मुलांमध्ये अध्यात्माची आवड निर्माण करणे : बाबांनी आमच्यात लहानपणापासूनच अध्यात्माची आवड निर्माण केली. माझ्या वयाच्या ५ – ६ वर्षांपासून नंतरची १२ वर्षे बाबांनी आमच्याकडून स्तोत्रपठण आणि आरती इत्यादी गोष्टी करून घेतल्या. त्यामुळे आमच्यात अध्यात्माची आवड निर्माण झाली आणि देवाच्या कृपेने पुढे आम्हाला सनातनच्या मार्गदर्शनानुसार साधना करण्याची संधी मिळाली.
३ इ. मुलांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी साहाय्य करणे : बाबांनी आम्हा तिन्ही भावंडांना साधना करण्यासाठी नेहमी प्रोत्साहन दिले. त्यांनी आम्हाला पूर्णवेळ साधना करण्यासाठी अनुमती दिली. घरी कितीही अडचणी आल्या, तरी त्यांनी आम्हाला साधनेसाठी आश्रमात रहाण्यासाठीच प्रोत्साहन दिले.
३ ई. दैनिक ‘सनातन प्रभात’ नियमित वाचणे : बाबा दैनिक ‘सनातन प्रभात’ नियमित वाचत असत. ते त्यातील चौकटींचा अभ्यास करत आणि सूचनांचे पालन करण्यासाठी प्रयत्न करत.
३ उ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव : आमचा सनातन संस्थेशी संपर्क आल्यावर घरातील सर्वांनी साधना चालू केली. बाबा म्हणायचे, ‘‘आम्ही सनातन संस्थेत आल्यावर आमच्या सर्व गोष्टींमध्ये पालट झाले.’’ माझा विवाह झाल्यानंतर आम्ही आई-बाबांना घेऊन रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेलो होतो. तेथे आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. आम्ही आश्रमातून सिंधुदुर्ग येथे जाण्यासाठी निघत असतांना मी बाबांना विचारले, ‘‘आपण घरी जातांना मार्गातील काही मंदिरात जाऊन देवदर्शन करूया.’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘प.पू. डॉक्टरांचे दर्शन झाले. त्यातच सर्व आले. आता काही नको.’’
३ ऊ. बाबांच्या निधनापूर्वी १ मास त्यांच्या शरिरावर सतत दैवी कण आढळत असत.’
४. सौ. रेणुका संदीप गावडे (कै. रामकृष्ण गोविंद गावडे यांची मोठी सून), शिरोडा, सिंधुदुर्ग.
अ. ‘बाबा (सासरे) वयाच्या ८३ व्या वर्षांपर्यंत कामे करत होते. ते घरातील प्रत्येक अडचणीवर तत्परतेने उपाययोजना काढत असत.
आ. त्यांना खाद्यपदार्थ चांगले बनवता येत असत.
इ. ते दैनिक ‘सनातन प्रभात’चे नियमित वाचन करत असत. ते सनातनचे ग्रंथ वाचत असत.
इ. त्यांचा बिंदूदाबन उपचारांविषयी अभ्यास होता. ते स्वतःवर बिंदूदाबनाचे उपचार करत असत.
ई. ते पशू-पक्ष्यांवरही प्रेम करत असत आणि त्यांना प्रेमाने खाऊ घालत असत.
उ. शेवटच्या आजारपणात ते मला ‘‘मी कोणता नामजप करू ?’’, असे विचारत असत. ते नियमित नामजप करत. त्यांची नामजपावर पुष्कळ श्रद्धा होती.’
५. सौ. सानिका संतोष गावडे (कै. रामकृष्ण गोविंद गावडे यांची धाकटी सून), कोल्हापूर सेवाकेंद्र
अ. ‘बाबा (सासरे) दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचून त्यातील चौकटींचा अभ्यास करून त्याप्रमाणे कृती करत असत. ते मलाही ‘‘सनातन प्रभात’ मधील सूचना वाचली का ?’, असे विचारत असत.
आ. बाबांनी त्यांच्या वयाच्या ८२ व्या वर्षांपर्यंत ‘स्वतःला काही त्रास होत आहे’, यासाठी कधीही विश्रांती घेतली नाही.
इ. बाबा सतत काही ना काही कामे करत असत. ‘माणसाने सतत कर्म करत रहायला हवे’, असे ते म्हणत. वयाच्या ८३ व्या वर्षापर्यंत ते स्वतःची सर्व कामे स्वतःच करत.
ई. एकदा दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये मी लिहिलेला एक लेख प्रकाशित झाला होता. बाबांनी तो अंक स्वतःकडे जपून ठेवला होता. मी सेवाकेंद्रातून घरी आल्यावर त्यांनी तो अंक माझ्या हातात दिला. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला.
उ. ते गंभीर आजारी असतांना त्यांच्यासाठी नामजपादी उपाय विचारून घेतले होते. त्यांना आम्ही अधून मधून नामजप करण्याची आठवण करून देत होतो. तेव्हा ते लगेच मोठ्याने नामजप करत असत.
ऊ. बाबांना ग्लानी येत असल्यामुळे ते नामजप करायला विसरत असत. आम्ही त्यांना दिसलो की, ते आम्हाला विचारून नामजप करत असत.
५ ए. गुरूंप्रती भाव
१. माझे लग्न झाल्यावर आमची एकदा गुरुदेवांशी भेट झाली. तेव्हा बाबा गुरुदेवांना म्हणाले, ‘‘मला व्यवहारात कधीच यश आले नाही.’’ तेव्हा गुरुदेव म्हणाले, ‘‘व्यवहारातील अपयश हेच अध्यात्मातील यश आहे. चांगले आहे.’’ त्यावर बाबा म्हणाले, ‘‘मुलगा आणि सून यांच्याकडून माझी कसलीच अपेक्षा नाही.’’ त्यानुसार बाबा शेवटपर्यंत वागले.
२. त्यांच्यामध्ये प.पू. डॉक्टरांप्रती भाव होता. ते सांगायचे, ‘‘मला कुडाळ येथील सेवाकेंद्रात असतांना प.पू. डॉक्टरांच्या कपड्यांना इस्त्री करण्याची संधी मिळाली होती.’’
६. श्री. अशोक भागवत (जावई), मथुरा सेवाकेंद्र
अ. ‘मी बाबांचे (सासर्यांचे) अंत्यदर्शन घेत असतांना मला त्यांचा चेहरा शांत दिसला.
आ. ‘बाबांच्या मनात कोणतीही इच्छा राहिली नाही’, असे मला जाणवले.’
७. कु. वेदिका अशोक भागवत (कै. रामकृष्ण गोविंद गावडे यांची नात, मुलीची मुलगी, आध्यात्मिक पातळी ५७ टक्के, वय १८ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
अ. ‘आजोबा मितभाषी होते.
आ. त्यांचा मनातून सतत नामजप चालू असे.
इ. आजोबांना आयुष्यात एकदाच गुरुदेवांची (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची) सेवा करण्याची संधी मिळाली होती. त्याबद्दल आजोबांच्या मनात सतत कृतज्ञताभाव होता. आजोबांना त्या क्षणांची आठवण येऊन भरून येत असे.’
८. कु. नंदन संदीप गावडे (कै. रामकृष्ण गोविंद गावडे यांचा नातू, मोठ्या मुलाचा मुलगा, आध्यात्मिक पातळी ५५ टक्के, वय १० वर्षे), शिरोडा, सिंधुदुर्ग.
अ. ‘आजोबा माझ्याकडून ‘शुभं करोती आणि श्रीरामरक्षा स्तोत्र’ म्हणून घेत असत, तसेच ते आमच्याकडून नामजपही करून घेत असत.
आ. मी बाहेरून किंवा खेळून घरी आल्यावर हात-पाय स्वच्छ धुतले नाही, तर त्याविषयी आजोबा मला जाणीव करून देत असत.
इ. मी रुग्णाईत असतांना ते माझ्यासाठी नामजपादी उपाय करायचे.’
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : १०.२.२०२५)