Sambhal Masjid Was Harihar Mandir :१५० वर्षांपूर्वी इंग्रजांनी केलेल्या सर्वेक्षणात शाही जामा मशीद मंदिर असल्याचे मिळाले होते पुरावे !

संभल (उत्तरप्रदेश) येथील श्री हरिहर मंदिराचे प्रकरण

संभल (उत्तरप्रदेश) – येथील पूर्वीचे श्री हरिहर मंदिर असणार्‍या शाही जामा मशिदीतील सर्वेक्षणाविषयीची आणखी एक नवीन माहिती समोर आली आहे. प्रशासनाचा दावा आहे की, वर्ष १८७४ च्या १५० वर्षे जुन्या सर्वेक्षण अहवालात जामा मशिदीत मंदिराचे पुरावे सापडले होते. हा अहवाल ब्रिटीश अभियंता आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाचे जनक मेजर जनरल ए. कनिंघम यांच्या देखरेखीखाली बनवण्यात आला होता. हा अहवाल वर्ष १८७४-७५ मध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षण अंतर्गत ब्रिटिश पुरातत्वशास्त्रज्ञ कार्लेल यांनी बनवला होता. या मशिदीच्या संदर्भात न्यायालयात खटला चालू आहे. न्यायालयाच्या आदेशाने याचे सर्वेक्षणही करण्यात आले आहे. त्याचा अहवाल अद्याप उघड व्हायचा आहे.

१. या अहवालात असे म्हटले आहे की, या इमारतीचा सुंदर घुमट कदाचित् अशा प्रकारच्या घुमटांमध्ये अद्वितीय आहे. त्याचा आकार एका महाकाय अंगठ्याच्या आतील पोकळीसारखा आहे. इमारतीचे मशिदीत रूपांतर करण्यासाठी लहान विटांनी बांधकाम करण्यात आल्याचे दिसते. जिथे जिथे भिंती प्लास्टरपासून मुक्त होत्या, तिथे तिथे मला (कनिंघम यांना) आढळले की, विटा लहान होत्या आणि मातीच्या गाळात बसवलेल्या होत्या.

२. जुन्या हिंदु पद्धतीने केलेल्या बांधकामात आणि आधुनिक मुसलमानी बांधकामात स्पष्ट भेद आहे. जुने हिंदु मंदिर मुसलमान बांधकामापासून वेगळे दिसून येते. चौकोनी हिंदु मंदिराला पूर्वेकडील भिंतीला ८ फूट रुंदीचा केवळ एकच दरवाजा होता; परंतु मुसलमानांनी येथे आणखी ४ दरवाजे उघडले. प्रत्येक दरवाजा ६ फूट रुंद आहे, चौकोनी मंदिराच्या उत्तरेकडील भिंतीत २ आणि दक्षिणेकडील भिंतीत २ असे दरवाजे उघडण्यात आले आहेत.

३. अहवालात म्हटले आहे की, घुमटाचा अंतर्गत आकार अंडाकृती आहे किंवा त्याच्या अक्षाभोवती फिरणार्‍या अर्ध्या लंबवर्तुळासारखा आहे. हा घुमट विटांनी बनलेला आहे आणि पृथ्वीराज चौहान याच्या काळात तो पुन्हा बांधला, असे म्हटले जाते. (आता जसा आहे तसा) वर्तुळाकार घुमट अष्टकोनावर उभा आहे. मध्यवर्ती चौकातील हिंदु मंदिराच्या भिंती मोठ्या विटांनी बनवलेल्या आणि दगडाने मढवलेल्या दिसतात; परंतु भिंतींवर लावलेले प्लास्टर त्या बनवलेल्या साहित्याला लपवते. माझा असा विश्वास आहे की, मुसलमानांनी ज्यांवर हिंदु धार्मिक चिन्हे होती तेथे प्लास्टार लावले आहे.