Eknath Shinde visits Malang Gad : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते श्रीक्षेत्र मलंगगडावर आरती !

दुर्गाडीप्रमाणे मलंगगड दर्गामुक्त होण्याच्या निकालाची आशा !

ठाणे, १२ फेब्रुवारी (वार्ता.) – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांनी मलंगमुक्तीची घोषणा दिली होती. त्यानंतर प्रतीवर्षी माघ पौर्णिमेला शिवसेनेच्या वतीने श्रीक्षेत्र मलंगगडावर आरती केली जाते. यंदाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ही आरती करण्यात आली. त्या वेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘ज्यांनी हिंदुत्वाचे विचार सोडले, त्यांना जनतेने थारा दिला नाही. ज्याप्रमाणे दुर्गाडी गडाचा निकाल न्यायालयातून मिळाला, तसाच निकाल मलंगगडासाठीही मिळेल, अशी आशा आहे.’’

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘स्व. आनंद दिघे यांनी चालू केलेली सगळी आंदोलने, उपक्रम, कार्यक्रम आजही जसेच्या तसे चालू आहेत; कारण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचाराने प्रेरित झालेले आम्ही शिवसैनिक आहोत. मी कुठेही असलो, तरी प्रतीवर्षी न चुकता श्रीमलंगगड यात्रेला येतो. धर्मवीर दिघेसाहेब मलंगगडावर जायचे, ती आठवण आजही माझ्या मनामध्ये आहे.’’

श्री नवनाथांचे स्थान असलेले श्रीक्षेत्र मलंगगड आणि धर्मांधांचा गड जिहाद !

ठाणे जिल्ह्यातील श्री मलंगगडावर नाथ संप्रदायाचे संस्थापक श्री मत्स्येंद्रनाथ आणि नवनाथांपैकी एक गोरक्षनाथ यांची मंदिरे आहेत. यासह जालिंदरनाथ, कानिफनाथ यांसह नवनाथांपैकी अन्य ५ नाथांच्या समाधी आहेत. गडावर शिव, गणेश आणि श्री दुर्गादेवी यांची मंदिरेही आहेत. श्रीक्षेत्र मलंगगड हे पूर्वापार श्री नाथसंप्रदायातील साधूंचे साधना केंद्र मानले जाते; परंतु मागील काही वर्षांपासून या गडाचे इस्लामीकरण करण्याचा नियोजनबद्ध प्रयत्न चालू आहे. गडावरील मलंगबाबा यांच्या समाधीवरच मुसलमानांनी ‘हाजी अब्दुर्रहमान मलंग शाहबाबा’ यांच्या नावाचा दर्गा बांधला आहे. श्रीक्षेत्र मलंगगडाऐवजी ‘हाजी मलंग’ असा उल्लेख प्रचलित करण्यात आला आहे. गडाच्या पायथ्यापासून ते समाधीपर्यंत मुसलमानांनी १०० हून अधिक दुकाने थाटली आहेत. गडावर मुसलमान वस्ती मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येत आहे. गडावर आणखी ४ दर्गे उभारण्यात आले आहेत. मलंगबाबांच्या समाधीला मुसलमानांच्या दुकानांनी घेरले आहे. कुणी हिंदु मलंगबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी गेल्यास त्यांच्यावर दबाव आणला जातो. येथे मलंगबाबांची समाधी असल्याचा एकही फलक लावण्यात आलेला नाही. या उलट दर्ग्याला ‘हाजी मलंग’ असे नाव देण्यात आले आहे.