
रत्नागिरी – हिंदू पतित (भ्रष्ट आणि दुराचारी) होण्याला कारण त्याचे मस्तक तिलकहीन आहे. गंध लावत नाही. वाणी मंत्रहीन आहे. हात शस्त्रहीन आहे. देव शस्त्रधारी आहेत. आपणही वेळ आली, तर शस्त्र हाती घेण्याची सिद्धता ठेवावी. जीवनात कठीण किंवा सुखाचे प्रसंग आले, तर कीर्तनात मिळालेल्या मार्गदर्शनानुसार वागायचे असते, असे मार्गदर्शन कीर्तनचंद्रिका ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे यांनी येथे केले.
आसमंत बेनवोलन्स फाऊंडेशन आणि अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी साहाय्यक मंडळ, खल्वायन आयोजित (कै.) शरद अनंत पटवर्धन यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित ‘गजर कीर्तना’च्या कार्यक्रमात ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे कीर्तन सादर करतांना बोलत होत्या.
या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कीर्तनाला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
दासबोध, हरीपाठ हे ग्रंथ प्रत्येकाने खिशात बाळगावे. यातून जीवनातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. उत्तम जीवनकौशल्य आणि भरकटलेल्या पिढीला सुयोग्य मार्गावर आणण्यासाठी ग्रंथ वाचणे आवश्यक आहे. आयुष्यातला गुंता सुटेल. संतांइतके समुपदेशनाचे काम कुणीही केलेले नाही. भगवान श्रीकृष्णाची कृष्णनीती छत्रपती शिवरायांनी वापरली होती. त्यामुळे स्वराज्य स्थापून कुलस्वामीनीच्या अवमानाचा आणि भावाच्या मृत्यूचा त्यांनी सूड घेतला. आपण पाश्चिमात्यांचे अंधानुकरण करतोय. आपण नको ते सण साजरे करत आहोत आणि आपल्या संस्कृतीचा र्हास करतोय. सर्वांनी आपली संस्कृती आणि धर्म यांचा प्रचंड अभिमान बाळगावा, असे आवाहन ह.भ.प. रोहिणी माने-परांजपे यांनी या वेळी केले.
‘संयुक्त राष्ट्र परिषदेने ठरवलेल्या शाश्वत विकास ध्येयांतील एक म्हणजे (क्रमांक १६) शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाज निर्मिती होय. यासाठी ‘गजर कीर्तना’चा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. रत्नागिरीवासियांचा याला उदंड प्रतिसाद मिळाल्यामुळे ‘खूप खूप आनंद वाटतो’, असे आसमंत बेनवोलन्स फाऊंडेशनचे संस्थापक संचालक नंदकुमार पटवर्धन यांनी सांगितले.